गडचिरोलीविदर्भ

शहरातील वाढत्या अपघातांवर नियंत्रणासाठी रिंगरोडची मागणी

नगराध्यक्ष निंबोरकर यांची जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्याशी सकारात्मक चर्चा

गडचिरोली : गडचिरोली शहराचा विस्तार होत असतानाच वाढती वाहतूक कोंडी आणि वारंवार होणाऱ्या जीवघेण्या अपघातांनी शहरवासीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. या पार्श्वभूमीवर, जड वाहतूक शहराबाहेरून वळवण्यासाठी तातडीने ‘रिंगरोड’ उभारण्यात यावा, अशी आग्रही मागणी नगराध्यक्षा ॲड. प्रणोती सागर निंबोरकर यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली आणि निवेदन सादर केले.

गेल्या काही वर्षांत गडचिरोली शहरातून जाणाऱ्या मुख्य मार्गांवर वाहनांची वर्दळ प्रचंड वाढली आहे. विशेषतः शहराच्या मध्यभागातून धावणारे मोठे मालवाहू ट्रक आणि जड वाहने अपघातांना निमंत्रण ठरत आहेत. शाळा-कॉलेज परिसर, गजबजलेली बाजारपेठ आणि मुख्य चौकांमध्ये जड वाहनांमुळे सतत वाहतुकीचा ताण जाणवत असून, यात अनेक निष्पाप नागरिकांनी आपला जीव गमावला आहे.

नगराध्यक्षा ॲड. निंबोरकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर रिंगरोडचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, “शहराच्या वाढत्या लोकसंख्येला आणि भविष्यातील गरजांना लक्षात घेता रिंगरोड प्रकल्प आता अनिवार्य झाला आहे. शहराबाहेरून जड वाहतूक वळवल्यास अंतर्गत रस्ते सुरक्षित होतील आणि अपघातांचे प्रमाण ७० ते ८० टक्क्यांनी कमी होण्यास मदत होईल.”

जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी या मागणीची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी संबंधित विभागांशी समन्वय साधून या प्रस्तावावर तातडीने तांत्रिक आणि प्रशासकीय पावले उचलण्याचे आश्वासन दिले आहे. गडचिरोलीच्या नियोजित विकासासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी हा प्रकल्प मैलाचा दगड ठरू शकतो, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

रिंगरोडमुळे जड वाहने शहराबाहेरून वळवल्याने मुख्य रस्ते मोकळे होतील. शाळा-कॉलेज परिसरात जड वाहनांना बंदी मिळाल्याने अपघात कमी होतील. शहरातील धूळ आणि आवाजाचे प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. शहराच्या बाह्य भागाचा विकास होऊन नवीन वस्त्यांचा विस्तार होईल. शहरातील वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी आता रिंगरोड प्रकल्पाची मागणी जोर धरू लागली असून, प्रशासन यावर कधी ठोस निर्णय घेते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button