
गोंदिया : जिल्हा न्यायालय गोंदिया येथे 27 जुलै रोजी राष्ट्रीय लोकअदातीचे आयोजन करण्यात आले होते. यात एकाच दिवशी न्यायालयात प्रलंबीत दिवाणी प्रकरणे 124, फौजदारी प्रकरणे 1025 तसेच पुर्वन्यायप्रविष्ठ प्रकरणे 5003 असे एकूण 6152 प्रकरणे निकाली काढण्यात आली. यातून पाच कोटी सत्यान्नव लाख दोन हजार सत्तावन रुपये एवढी वसुली झाली.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण सर्वोच्च न्यायालय दिल्ली व राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय मुंबई यांचे निर्देशानुसार प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष ए.टी. वानखेडे तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव एन.के. वाळके यांच्या मार्गदर्शनात 27 जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये तडजोडीतून एकाच दिवशी 6152 प्रकरणे निकाली काढण्यात आली.



