
प्रशासनाचे दुर्लक्ष ; वाहतुकीला अडथळा
भंडारा : गावामधून जाणाऱ्या व महामार्गावरील पादचारी मार्गाचे काम पूर्ण झाले असले तरी या मार्गालगत असलेली नादुरुस्त वाहने मात्र हटलेली नाहीत.
पोलिस स्टेशन गेटच्या अगदी जवळून जाणाऱ्या ठिकाणी आजही एक ट्रक अनेक दिवसांपासून उभा आहे. आता तर त्या ट्रकमध्ये चक्क गवत उगवले आहे. तरीही त्याकडे कुणाचे लक्ष नाही. या पोलिस ठाण्याला जिल्हा पोलिस अधीक्षकांनी भेट दिली होती. तेव्हाही ही बाब काही मंडळींनी लक्षात आणून दिली होती. तीच परिस्थिती बस थांबा परिसरात आहे. गावात तर गल्लोगल्लीत असा प्रकार बिनधास्त सुरू आहे. यामुळे ग्रामस्थ, प्रवाशांना तथा वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अड्याळ बस थांबा परिसर ते पेट्रोल पंप परिसर सध्या हॉट स्पॉट ठरत चाललेला आहे. महामार्ग तयार झाला परंतु कुठलीही सुरक्षेची व्यवस्था येथे नाही. दररोज शेकडो विद्यार्थी येथून बसने ये-जा करतात. बस पकडण्यासाठी मार्ग ओलांडावा लागतो. अशावेळी अपघाताची शक्यता अधिक असते.
महामार्गावरील पथदिव्यांची दयनीय अवस्था आहे. याकडेही आता तातडीने लक्ष घालण्याची मागणी होत आहे. पथदिवे बंद असून केवळ खांब तेवढे उभे आहेत. त्या खांबांचा वापर अवैधपणे होर्डिंगसाठी केला जात आहे.



