गडचिरोलीविदर्भ

जिल्ह्यात सुसज्ज ‘कॅन्सर हॉस्पिटल’ उभारण्यात यावे – डॉ. प्रणय खुणे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

गडचिरोली : महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर असलेल्या आणि भौगोलिकदृष्ट्या दुर्गम समजल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात कर्करोगाचे (कॅन्सर) प्रमाण चिंतेचा विषय ठरत आहे. या गंभीर आजाराच्या निदानासाठी आणि उपचारासाठी जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांना नागपूर किंवा इतर मोठ्या शहरांकडे धाव घ्यावी लागते. ही पायपीट थांबवण्यासाठी गडचिरोलीतच सुसज्ज कर्करोग रुग्णालय उभारण्यात यावे, अशी आग्रही मागणी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे यांनी केली आहे.

गडचिरोली जिल्ह्यात आरोग्य सुविधांच्या अभावामुळे कर्करोग रुग्णांचे वेळेवर निदान होत नाही. परिणामी, शेकडो रुग्णांना आर्थिक टंचाई असतानाही हजारो रुपये खर्च करून दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये उपचारासाठी जावे लागते. अनेकदा प्रवासाचा खर्च आणि वेळेचा अपव्यय यामुळे उपचार अर्धवट राहतात. या पार्श्वभूमीवर, जिल्ह्यातच केंद्र विकसित झाल्यास शोषित आणि वंचित नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, असे डॉ. खुणे यांनी निवेदनात म्हटले आहे.

राज्याचे मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन गडचिरोलीत कर्करोग रुग्णालय उभारण्यासाठी विशेष पुढाकार घ्यावा, अशी विनंती डॉ. प्रणय खुणे यांनी केली आहे.

केवळ उपचारच नव्हे, तर या आजाराशी झुंज देणाऱ्या रुग्णांना मानसिक आधाराचीही गरज असल्याचे डॉ. खुणे यांनी नमूद केले. वेळेवर निदान: कर्करोगाचे प्राथमिक अवस्थेत निदान होण्यासाठी व्यापक जनजागृती आवश्यक. मानसिक आधार: रुग्णांना केवळ वैद्यकीय उपचार नाही, तर सामाजिक पाठबळ मिळणे गरजेचे. सुदृढ जीवनशैली: नागरिकांनी कर्करोगमुक्त भविष्यासाठी निरोगी जीवनशैलीचा अंगीकार करण्याचा संकल्प करावा. गडचिरोली जिल्ह्याला आरोग्यदृष्ट्या सक्षम आणि सुदृढ बनवणे ही काळाची गरज आहे. आपण सर्वांनी मिळून कर्करोगमुक्त समाजासाठी प्रयत्न करायला हवेत. असेही राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे डॉ. प्रणय खुणे म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button