क्राईमचंद्रपूरविदर्भ

एकतर्फी प्रेमातून तरुणीची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपीला जन्मठेप

प्रत्यक्षदर्शी आईची साक्ष अन् डीएनए (DNA) चाचणीचा भक्कम वैज्ञानिक पुरावा ठरला निर्णायक; आरोपीला १५ हजारांचा दंड

चंद्रपूर : एकतर्फी प्रेमातून आणि लग्नास वारंवार नकार दिल्याच्या कारणावरून एका २७ वर्षीय विवाहित तरुणीचा घरात घुसून गळा चिरून निर्घृण खून करणाऱ्या आरोपीला चंद्रपूर येथील अतिरिक्त सत्र तथा विशेष न्यायालयाने ‘जन्मठेपेची’ कठोर शिक्षा सुनावली आहे. प्रत्यक्षदर्शी आईची साक्ष, घटनास्थळावरून जप्त केलेला रक्ताळलेला चाकू आणि न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा डीएनए अहवाल या भक्कम पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत हा ऐतिहासिक निकाल दिला.

चंद्रपूर येथील अतिरिक्त सत्र तथा विशेष न्यायालयाच्या माननीय न्यायाधीश श्रीमती आय. ए. शेख यांनी आरोपी विवेक ब्रह्मदास चौधरी (वय २९ वर्षे) याला जन्मठेप आणि १५ हजार रुपयांचा दंड ठोठावला. दंड न भरल्यास आरोपीला आणखी एक वर्ष अतिरिक्त सश्रम कारावासाची शिक्षा भोगावी लागणार आहे.

नागभीड येथील मृत तरुणीचे २०१६ मध्ये लग्न झाले होते. मात्र, पतीसोबत झालेल्या मतभेदांमुळे ती एप्रिल २०२१ पासून नागभीड येथे आपल्या आईकडे येऊन राहत होती. आरोपी विवेक चौधरी हा तिच्या पतीच्या शेजारी राहत असल्याने त्याचे तरुणीवर एकतर्फी प्रेम होते. त्याने तिला वारंवार लग्नासाठी विचारून दबाव टाकला होता, तसेच नकार दिल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली होती.

१४ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास, तरुणी घरात एकटी असल्याचे पाहून आरोपीने घरात बेकायदेशीर प्रवेश केला आणि तिच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला चढवला. त्याच वेळी तिची आई घरात परतली असता, आरोपी विवेक हा तरुणीचा गळा चिरत असल्याचे त्यांनी प्रत्यक्ष पाहिले. आईने आरडाओरड करताच आरोपी घटनास्थळावरून पळून गेला. या अत्यंत भीषण हल्ल्यात तरुणीचा जागीच मृत्यू झाला होता.

या खळबळजनक हत्याकांडानंतर नागभीड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे यांनी अत्यंत गतीने व कौशल्याने तपास करून न्यायालयात भक्कम दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयात सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील श्रीमती एस. बी. रामटेके यांनी बाजू मांडत एकूण १५ महत्त्वाचे साक्षीदार तपासले. या खटल्यात सर्वात निर्णायक पुरावा ठरला तो म्हणजे, आरोपीच्या कपड्यांवर आणि जप्त केलेल्या चाकूवर मिळालेले रक्ताचे डाग हे मृत तरुणीच्या रक्ताशी ‘डीएनए’ चाचणीत तंतोतंत जुळले. या वैज्ञानिक पुराव्यामुळे आरोपीला पळ काढण्यास कोणतीही जागा उरली नाही.

न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि पुरावे ग्राह्य धरून आरोपी विवेक चौधरी याला भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम ३०२ (खून), ४५० (घरात बेकायदेशीर प्रवेश), ३५४-डी (पाठलाग करणे) आणि ५०६ (भाग-२) (जीवे मारण्याची धमकी देणे) अंतर्गत दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली. न्यायालयाच्या या कडक निर्णयामुळे पीडित कुटुंबाला अखेर ४ वर्षांनंतर न्याय मिळाला असून, परिसरात या निकालाचे स्वागत होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button