
काँग्रेसला मोठा धक्का ; ज्येष्ठ अधिवक्ता संजय गुरू यांचाही मुंबईत सपत्नीक राष्ट्रवादीत प्रवेश
देसाईगंज : आगामी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असतानाच देसाईगंजच्या राजकारणात शुक्रवारी (दि. ७) मोठी उलथापालथ झाली. येथील माजी नगराध्यक्ष आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जेसा मोटवानी आणि ज्येष्ठ अधिवक्ता संजय गुरू यांनी सपत्नीक राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
मुंबई येथे पार पडलेल्या या पक्षप्रवेश सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार, ज्येष्ठ नेते खा. प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, गोंदियाचे पालकमंत्री इंद्रनिल नाईक आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर आदी मान्यवर उपस्थित होते.
या पक्षप्रवेशादरम्यान देसाईगंजच्या आगामी नगराध्यक्षपदासाठी नीता संजय गुरू यांची उमेदवारी सुद्धा जाहीर झाल्याचे समजते, ज्यामुळे ही राजकीय घडामोड अधिक महत्त्वाची ठरली आहे. जेसा मोटवानी हे काही दिवसांपासून काँग्रेसमध्ये नाराज होते. माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या जाहीर सभेच्या वेळीच ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती.
या पक्षप्रवेश सोहळ्याला गडचिरोलीतून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर, माजी जि. प. सभापती नाना नाकाडे आदी नेते उपस्थित होते. मोटवानी आणि संजय गुरू यांच्या पक्षप्रवेशामुळे देसाईगंज नगर परिषदेच्या निवडणुकीतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.



