गडचिरोलीविदर्भ

गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; ७.३८ लाख मतदारांचा समावेश, ३० सप्टेंबरपर्यंत दावे व हरकती नोंदविण्याची संधी

२७,४१४ ‘अनमॅप्ड’ तर ५६,८५२ नोंदींमध्ये विसंगती; संबंधित मतदारांना नोटीस देऊन सुनावणी

 

२७,४१४ ‘अनमॅप्ड’ तर ५६,८५२ नोंदींमध्ये विसंगती; संबंधित मतदारांना नोटीस देऊन सुनावणी
गडचिरोली, दि. ३१ ऑगस्ट  : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम-२०२६ अंतर्गत १ ऑक्टोबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी आज, ३१ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आली. या प्रारूप मतदार यादीवर नागरिकांना ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत दावे व हरकती नोंदविता येणार आहेत.
प्रारूप मतदार यादीनुसार जिल्ह्यात ३ लाख ७२ हजार ८७८ पुरुष, ३ लाख ६५ हजार ४११ महिला आणि १२ तृतीयपंथी मतदारांसह एकूण ७ लाख ३८ हजार ३०१ मतदारांचा समावेश आहे. याशिवाय अनुपस्थित, स्थलांतरित, मृत किंवा अन्य कारणांमुळे वर्गीकृत मतदारांची संख्या ९० हजार ६१६ आहे.
प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अविश्यांत पंडा यांच्या अध्यक्षतेखाली आज राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. बैठकीत उपस्थित राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना प्रारूप मतदार यादी उपलब्ध करून देण्यात आली.
ही प्रारूप मतदार यादी मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कार्यालय देसाईगंज, गडचिरोली व अहेरी, जिल्ह्यातील सर्व सहायक मतदार नोंदणी अधिकारी कार्यालये, सर्व ९७३ मतदान केंद्रे तसेच जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे प्रसिद्ध करण्यात आली आहे.
दावे व हरकतींच्या कालावधीत नोंदींमध्ये विसंगती असलेले तसेच पूर्वीच्या नोंदीशी जुळवणी न झालेले मतदार यांना सुनावणीची संधी देण्यात येणार आहे. यासाठी ECI NET पोर्टलवरून संबंधित मतदारांसाठीची नोटीस ऑटो जनरेट होणार आहे. मतदार नोंदणी अधिकारी त्यावर सुनावणीची तारीख व ठिकाण नमूद करून संबंधित मतदारांना नोटीस उपलब्ध करून देतील.
जिल्ह्यात सध्या २७ हजार ४१४ ‘जुळवणी न झालेले मतदार ’ तर ‘नोंदींमध्ये विसंगती असलेले’ ५६ हजार ८५२ मतदार आहेत. संबंधित मतदारांची मतदान केंद्रनिहाय संख्या लक्षात घेऊन त्यांच्या सोयीसाठी शहरी तसेच ग्रामीण भागात सुनावणीची ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. तसेच संपर्क होऊ न शकलेल्या मतदारांची अद्ययावत यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
दावे व हरकतींच्या कालावधीत ज्या मतदारांना सुनावणीसाठी नोटीस प्राप्त झाली आहे, त्यांनी निर्धारित दिवशी आवश्यक कागदपत्रांसह सुनावणीस उपस्थित राहून निवडणूक प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन उप जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल जाधव यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button