गडचिरोलीविदर्भ

माओवादाचा शेवट; ५० आत्मसमर्पित माओवाद्यांना मूळ जिल्ह्यात सुरक्षित रवाना

गडचिरोली पोलिसांचा पुनर्वसनाचा पुढाकार; ‘प्रोजेक्ट संजीवनी’तून रोजगार, प्रशिक्षण, आरोग्य व सामाजिक पुनर्वसनाला बळ

गडचिरोली पोलिसांचा पुनर्वसनाचा पुढाकार; ‘प्रोजेक्ट संजीवनी’तून रोजगार, प्रशिक्षण, आरोग्य व सामाजिक पुनर्वसनाला बळ
गडचिरोली, दि ३१ ऑगस्ट :कधीकाळी माओवादी हिंसाचाराचे केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात आता सशस्त्र माओवादी अस्तित्वात नसल्याचे चित्र आहे. हिंसाचाराचा मार्ग सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात परतलेल्या आत्मसमर्पित माओवादी सदस्यांच्या पुनर्वसन प्रक्रियेला गडचिरोली पोलिसांनी आणखी एक महत्त्वाचा टप्पा दिला. गेल्या काही महिन्यांपासून पुनर्वसन प्रक्रियेत असलेल्या ५० आत्मसमर्पित माओवादी सदस्यांना आज त्यांच्या मूळ जिल्ह्यांकडे सुरक्षितपणे रवाना करण्यात आले. यानिमित्त गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले.
गडचिरोली पोलिसांच्या माओवादीविरोधी अभियानासोबतच केंद्र व राज्य शासनाच्या आत्मसमर्पण व पुनर्वसन धोरणाचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. सन २००५ पासून राबविण्यात येत असलेल्या आत्मसमर्पण योजनेला प्रतिसाद देत आतापर्यंत एकूण ८१९ माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे. हिंसाचाराचे जीवन सोडून शांततेचा आणि विकासाचा मार्ग स्वीकारलेल्या या सदस्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सन्मानाने आणण्यासाठी पोलिसांकडून विविध स्तरांवर प्रयत्न केले जात आहेत.
केवळ पुनर्वसन नव्हे, नव्या आयुष्याची सुरुवात
आत्मसमर्पित सदस्यांना आर्थिक मदतीसोबतच आवश्यक शासकीय व कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता, रोजगाराच्या संधी, स्वयंरोजगार तसेच कौशल्य विकास प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यात आले. पुनर्वसनाची प्रक्रिया केवळ कागदोपत्री न राहता आत्मसमर्पित सदस्यांना नवीन ओळख, आत्मविश्वास, कौशल्य आणि सन्मानाने जगण्याची संधी मिळावी, यासाठी गडचिरोली पोलिसांनी ‘प्रोजेक्ट संजीवनी’च्या माध्यमातून विशेष प्रयत्न केले.
आरोग्याच्या दृष्टीनेही आत्मसमर्पित सदस्यांसाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. ‘ऑपरेशन रोशनी’अंतर्गत नेत्रोपचार शिबिरे, आवश्यक शस्त्रक्रिया, तसेच मानसिक आरोग्यासाठी समुपदेशन करण्यात आले. आत्मविश्वास वाढविण्यासाठी ध्यान, योग व विविध शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांमुळे आत्मसमर्पित सदस्यांना हिंसाचाराच्या भूतकाळातून बाहेर पडून सामान्य जीवनाशी जुळवून घेण्यास मदत झाली.
४६ जोडप्यांचे विवाह; ८८ जणांना रोजगाराचे प्रशिक्षण
‘प्रोजेक्ट संजीवनी’च्या माध्यमातून आतापर्यंत ४६ आत्मसमर्पित माओवादी जोडप्यांचे सामूहिक विवाह आयोजित करून त्यांना कौटुंबिक जीवनाची नवी सुरुवात करून देण्यात आली आहे. तसेच ८८ आत्मसमर्पित माओवादी सदस्यांना लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून कौशल्य विकास प्रशिक्षण व रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
“कुटुंबासोबत सुरक्षित आणि सन्मानाचे जीवन जगा”
यावेळी पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी आत्मसमर्पित सदस्यांना मार्गदर्शन करताना, हिंसाचाराचा मार्ग कायमचा सोडून मिळालेल्या संधींचा उपयोग करून आत्मनिर्भर होण्याचे आवाहन केले. कुटुंबासोबत सुरक्षित आणि सुखी जीवन जगत समाजाच्या मुख्य प्रवाहात सन्मानाने पुढे जाण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सदैव त्यांच्या पाठीशी राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
कार्यक्रमात आत्मसमर्पित माओवादी सदस्यांनीही मनोगत व्यक्त केले. आत्मसमर्पणानंतर पोलिसांकडून वेळोवेळी मिळालेल्या सहकार्यामुळे नव्या आयुष्याकडे पाहण्याचा आत्मविश्वास मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
या पुनर्वसन प्रक्रियेसाठी पोलीस अधीक्षक एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधीरा, सहायक पोलीस अधीक्षक धानोरा सुयश कुमार सिंग, सहायक पोलीस अधीक्षक भामरागड सागर भामरे आणि पोलीस उपअधीक्षक (अभियान) सुनील उईके यांच्या मार्गदर्शनाखाली आत्मसमर्पण शाखेचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र पिवाल तसेच पोलीस अंमलदारांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button