
ज्ञान, संस्कार आणि तंत्रज्ञानाचा संगम ; विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आरमोरीत नवे हक्काचे व्यासपीठ
आरमोरी : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून आरमोरी शहरात विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाचे नवे दालन खुले झाले आहे. ‘चाणक्य सार्वजनिक वाचनालय व अभ्यासिकेचा’ भव्य उद्घाटन सोहळा ३ जानेवारी रोजी माजी आमदार कृष्णा गजबे यांच्या शुभहस्ते उत्साहात पार पडला.
यावेळी मार्गदर्शन करताना माजी आमदार कृष्णा गजबे म्हणाले की, “शिक्षण ही प्रगतीची गुरुकिल्ली आहे. आजच्या स्पर्धात्मक युगात ज्ञान, संस्कार आणि तंत्रज्ञान यांचा संगम साधणारे हे वाचनालय परिसरातील विद्यार्थी, युवक आणि वाचकांसाठी निश्चितच दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठरणार आहे.” सावित्रीबाईंच्या जयंतीदिनी अशा उपक्रमाची सुरुवात होणे हीच त्यांना खरी आदरांजली असल्याचेही त्यांनी नमूद केले.
याप्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष पंकज खरवडे, नगरसेवक विलास पारधी, राहुल तितीरमारे, अक्षय हेमके, स्वप्निल कारकुरवार, सुरज कारकुरवार, कुणाल पिलारे, चंदा राऊत, ॲड. नर्गिस पठाण, जितू ठाकरे, वेदांत कापकर आदी उपस्थित होते.
चाणक्य सार्वजनिक वाचनालयाच्या उभारणीसाठी अध्यक्ष नेपचंद्र पेलने यांच्यासह महेश पेलने, रोशन दुमाने, अक्षय बारापात्रे, अजय कुथे, विशाल कानतोडे, सम्यक मेश्राम, गौरव मेश्राम, ज्ञानेश्वर बारापात्रे आणि राहुल बारापात्रे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी निकिता ठवकर, आचल उइके, नंदू वादिकर, समीर कोल्हे, रुपेश निंबेकर, विक्की, तेजस या विद्यार्थ्यांसह अनेक स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या युवकांनी सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाचनालयाचे अध्यक्ष नेपचंद्र पेलने यांनी केले, ज्यातून त्यांनी अभ्यासिकेच्या स्थापनेमागचा उद्देश स्पष्ट केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश पेलने यांनी प्रभावीपणे केले, तर उपस्थितांचे आभार अक्षय बारापात्रे यांनी मानले. आरमोरी शहरातील या सुसज्ज अभ्यासिकेमुळे स्पर्धा परीक्षेचा सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी अडचण दूर झाली आहे.



