
‘तुमच्या एकजुटीमुळेच हे शक्य झाले’ – गजबे यांनी गावकऱ्यांचे मानले आभार
आरमोरी : पाथरगोटा गावासाठी अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या स्वतंत्र ग्रामपंचायतीच्या मागणीला अखेर यश मिळाले आहे. गावाच्या श्री बाल गणेश उत्सव मंडळाने आयोजित केलेल्या संगीत नाटक ‘रुसली साडी माहेरची’ च्या उद्घाटनावेळी, यासाठी सातत्याने प्रयत्न करणारे माजी आमदार कृष्णा गजबे यांचा गावकऱ्यांकडून व मंडळाकडून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी गजबे यांनी गावकऱ्यांच्या एकजुटीचे कौतुक केले.
या कार्यक्रमाला माजी आरोग्य सभापती भारत बावनथडे, भाजप तालुका अध्यक्ष पंकज खरवडे, सामाजिक कार्यकर्ते नंदू नागतोडे, अमोल खेडकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
माजी आमदार गजबे यांनी अनेक दशकांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासनदरबारी सातत्याने पाठपुरावा केला. सुमारे १,१०० लोकसंख्या असलेल्या पाथरगोटा गावासाठी मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने गावकरी पळसगावहून वेगळ्या ग्रामपंचायतीची मागणी करत होते. गजबे यांच्या प्रयत्नांमुळे जिल्हा परिषदेने पाठवलेल्या प्रस्तावाला शासनाने मंजुरी दिली आणि पाथरगोटा आता स्वतंत्र ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाईल.
ग्रामपंचायत मिळाल्याचा आनंद असला तरी, आरक्षणाचा वाद अजूनही कायम आहे. गावात अनुसूचित जमातीची लोकसंख्या नसतानाही, १९८०-८५ च्या अधिसूचनेनुसार हे गाव ‘पेसा’ यादीत असल्याने सरपंचपद अनुसूचित जमातीसाठी आरक्षित ठेवण्यात आले आहे. यामुळे ओबीसी आणि इतर प्रवर्गातील नागरिकांना प्रतिनिधित्व मिळण्यात अडचणी येत आहेत. या प्रश्नावरही आपण शासनदरबारी पाठपुरावा करत असल्याचे गजबे यांनी सांगितले.
गजबे यांनी सत्काराला उत्तर देताना, ‘ग्रामपंचायत मिळवण्याचे खरे श्रेय पाथरगोटावासीयांच्या एकजुटीला जाते,’ असे सांगून आपल्या संघर्षाची आठवण करून दिली. त्यांनी सांगितले की, ‘ग्रामपंचायत मंजुरीसाठी फाईलला मंत्रालयापर्यंत ‘टेबल टू टेबल’ नेऊन मंजुरी मिळवावी लागली.’



