गणपती विसर्जनादरम्यान इमारतीचा सज्जा कोसळला ; १० महिला जखमी
लाखांदूर तालुक्यातील बारव्हा येथील घटना

शेडमुळे मोठी दुर्घटना टळली
भंडारा : सार्वजनिक गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान मार्गातील दुकानांच्या स्लॅबवर चढलेल्या लोकांचा भार सहन न झाल्याने सज्जा कोसळला. यात १० महिला जखमी झाल्या. त्यापैकी चार गंभीर असून यात दोन मुलीचाही समावेश आहे. ही घटना लाखांदूर तालुक्यात बारव्हा या गावात बुधवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली.
गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान गावातील मुख्या बाजारपेठीच्या मार्गावरील इमारतीच्या छतावर उभे राहून अनेक महिला, मुले ही मिरवणूक पहात होते. दरम्यान, अंकुश रामदास बोकडे व शेषराव बाबुराव शिंदे यांच्या मालकीच्या इमारतीवरही मोठी गर्दी झाली होती. इमारत आधीच जूनी असल्याने भार सहन न झाल्याने इमारतीचा तीन फुटाचा सज्जा (पोर्च) खचला. यामुळे अनेकजण खाली कोसळले.
पोर्चच्या समोर टिनाचे शेड असल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. समोर टिनाचे शेड नसते तर ३५ ते ४० लोकांचा जीव धोक्यात आला असता. विशेष म्हणजे, दुर्घटनाग्रस्त त्या शेडखाली घटनेच्या पाच मिनिटापूर्वी ४० ते ५० महिला शेडखाली विसर्जन मिरवणूक पहात होत्या. शेडखाली तीन दुचाकी होत्या. त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
जखमींमध्ये महिलांचीच संख्या अधिक आहे. त्यात अर्चना विजय देव्हारे (४०) आणि उमा गुणेश देशमुख (३०) या दोन महिलांसह रिया रेवाचंद शेंदरे (१५), नंदिनी सुरेश बुद्धे (१५) या दोन मुली गंभीर जखमी आहेत. तसेच अनिता राजेंद्र सोनवाणे (४५), मीना तिलकसिंह बैस (४०), प्रमिला शेखर जांभुळकर (४०), चंद्रकला मोहन सोनवाणे (४२), नूतन नरेंद्र नाकाडे (३६), दीपाली दिलीप घरडे (३५) या ६ महिला किरकोळ जखमी आहेत. किरकोळ जखमी महिलांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी चंद्रसुरेश डोंगरवार यांनी दिली. गंभीर जखमींना लाखांदूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेनंतर डीजे बंद करून शांततेत गणेश विसर्जन करण्यात आले.



