गडचिरोलीविदर्भ

अहेरी नगरपंचायत पोटनिवडणूक : भाग्यश्री आत्राम यांच्या नेतृत्वाखाली संजना मडावी यांचा दणदणीत विजय

अहेरी : अहेरी नगरपंचायतच्या प्रभाग क्रमांक ९ मधील अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) म्हणजेच ‘तुतारी’ चिन्हाच्या उमेदवार संजना हनुमंतू मडावी यांनी १९७ मते मिळवून दणदणीत विजय संपादन केला आहे. एका सामान्य आणि तळागाळातील महिला कार्यकर्त्याला मिळालेल्या या ऐतिहासिक विजयामुळे पक्ष कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून अहेरीत ‘तुतारी’चा जोरदार जयघोष सुरू आहे.

सदर पोटनिवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शप) नेत्या भाग्यश्री आत्राम (हलगेकर) यांच्या थेट नेतृत्वाखाली लढवली गेली होती. कोणत्याही बड्या चेहऱ्याला प्राधान्य न देता पक्षातील एका प्रामाणिक, लहान आणि तळागाळातील सामान्य कार्यकर्त्यावर विश्वास दाखवत भाग्यश्री आत्राम यांनी संजना मडावी यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. त्यांच्या या धाडसी व लोकशाहीभिमुख निर्णयावर अहेरीतील सुज्ञ मतदारांनी शिक्कामोर्तब करत विजयाची मोठी मोहोर उमटवली आहे. पक्षातील सर्वसामान्य घटकाला संधी देऊन त्याचे नेतृत्व विकसित करण्याची भाग्यश्रीताईंची भूमिका या निकालाने पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे.

अभूतपूर्व विजयानंतर नवनिर्वाचित नगरसेविका संजना मडावी यांनी भावूक होत आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या, “भाग्यश्री आत्राम (हलगेकर) यांनी माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्यावर जो अथांग विश्वास दाखवला आणि मला उमेदवारी दिली, त्याच बळावर मी ही निवडणूक लढवू शकले. आजचा हा विजय माझा वैयक्तिक नसून तो आदरणीय भाग्यश्रीताई, पक्षाचे अहोरात्र झटणारे सर्व पदाधिकारी, निष्ठावान कार्यकर्ते आणि प्रभाग क्रमांक ९ मधील सर्वसामान्य जनतेचा आहे. मी प्रभागाच्या विकासासाठी कटिबद्ध राहीन.”

मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होऊन संजना मडावी यांच्या विजयाची अधिकृत घोषणा होताच, उपस्थित कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतिशबाजी करत एकच जल्लोष केला. या निकालामुळे अहेरीच्या स्थानिक राजकीय समीकरणांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाचे बळ आणि जनमानसातील स्थान अधिक मजबूत झाल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. हा निकाल म्हणजे आगामी काळासाठी भाग्यश्री आत्राम यांच्या खंबीर नेतृत्वाला मतदारांनी दिलेली फार मोठी आणि महत्त्वाची पावती मानली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button