
नगराध्यक्ष सचिन शेंडे होणार सहभागी ; पोलीस निरीक्षक किशोर पर्वते दाखवणार हिरवी झेंडी
गोंदिया: निरोगी आरोग्य आणि प्रदूषणमुक्त पर्यावरणाचा जागर करण्यासाठी गोंदिया सायकलींग संडे असोसिएशनच्या वतीने सलग सहाव्या वर्षी गोंदिया ते डोंगरगड (छत्तीसगड) सायकल वारीचे आयोजन करण्यात आले आहे. १ फेब्रुवारी रोजी सकाळी ५ वाजता शहरातील जयस्तंभ चौक येथून ४० युवक-युवतींचा हा ताफा ‘माँ बम्लेश्वरी’च्या दर्शनासाठी आणि ‘सायकल चालवा’ असा संदेश देण्यासाठी रवाना होणार आहे.
वातावरणातील बदल आणि ‘ग्लोबल वॉर्मिंग’च्या धोक्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी गोंदियातील तरुणांनी २०१७ मध्ये ‘एक दिन सायकल के नाम’ हा उपक्रम हाती घेतला. प्रत्येक रविवारी २० ते २५ किलोमीटर सायकल चालवून नागरिकांना आरोग्याबाबत जागरूक केले जाते. याच मोहिमेचा भाग म्हणून दरवर्षी ‘मातृ-पितृ दिनाचे’ औचित्य साधून गोंदिया ते डोंगरगड ही सायकल यात्रा काढली जाते.
यावर्षीच्या सायकल वारीचे विशेष आकर्षण म्हणजे गोंदिया नगर परिषदेचे अध्यक्ष सचिन शेंडे हे स्वतः सायकल चालवून या वारीत सहभागी होणार आहेत. या मोहिमेला प्रारंभ करण्यासाठी गोंदिया शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर पर्वते उपस्थित राहणार असून ते सायकल वारीला हिरवी झेंडी दाखवून मार्गस्थ करतील.
१ फेब्रुवारी रोजी सकाळी गोंदियाहून निघालेले हे सायकलस्वार डोंगरगड येथे पोहोचून माता बम्लेश्वरीचे दर्शन घेतील आणि तिथेही प्रदूषणमुक्तीचा संदेश देतील. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा सायकलनेच डोंगरगड ते गोंदिया असा परतीचा प्रवास केला जाईल.
या सायकल वारीत घनश्याम उके, मंजू कटरे, रवी सपाटे, विजय येडे, दिपाली वाढई, रोमी गुलाटी, संजय मेश्राम, भागीरथ जीवानी, विजय सोनी, आदित्य सव्वालाखे, महेश पांडे, सुनील कावडे, भुमेश्वर वाघाडे, अजित शेणमारे, त्रिवेणी उईके, राहुल लधाणी, शुभम भिमटे, उमेश माधवाणी, माजी सैनिक उदय निर्वाण, मोना निर्वाण, धावक मुन्नालाल यादव, नलिनी जाधव, पूजा तिवारी, संगीता गायधने, अक्षय सोनवाने, रुद्राक्ष गौतम, मोहित चौधरी, लिलाधर रहांगडाले, गौरव नेवारे, विक्रांत मिश्रा, गजानन तरोणे, कवल गुलाटी, प्रतीक बजाज, राहुल बागडे, अशोक मेश्राम, ओमप्रकाश गायधने, चुन्नीलाल किरणापुरे, रामेश्वर किरणापुरे, सुखालाल मेंढे आणि निखिल बाहेकर यांचा समावेश आहे. दर रविवारी एक ते दीड तास सायकल चालवून शहराला प्रदूषणमुक्त आणि स्वतःला फिट ठेवण्याचे आवाहन या ग्रुपने केले आहे.



