
चंद्रपूर : अन्न व औषध प्रशासन विभागाने गुरुवारी (दि. २२) गडचांदूर येथून ३ लाख २७ हजार २८५ रुपयांचा प्रतिबंधित तंबाखू साठा जप्त करण्यात आला. याप्रकरणी दोषींवर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अन्न व औषध प्रशासन कार्यालयातील अन्न सुरक्षा अधिकारी जी.टी. सातकर यांनी गडचांदूर शहरातील आरोपी विक्रेता हाजी अनवर रज्जाक आलेख यांच्या दुकानाची तपासणी केली. यामध्ये होला हुक्का शिशा तंबाखू (प्रतिबंधित तंबाखू), ईगल हुक्का शिशा तंबाखू, मजा १०८ हुक्का शिशा तंबाखू, विमल पानमसाला अन्नपदार्थांचा साठा विक्रीसाठी साठविल्याचे आढळून आले. या अन्नपदार्थांचे विश्लेषणास्तव नमुने घेऊन ३ लाख २७ हजार २८५ रुपयांचा प्रतिबंधित पदार्थ ताब्यात घेण्यात आला.
विक्रेत्याविरुद्ध गडचांदूर पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला. व्यावसायिकांनी प्रतिबंधित अन्नपदार्थ खर्रा, सुगंधित तंबाखू, पानमसाला, सुगंधित सुपारी संबंधित कोणताही व्यवसाय करू नये. नियमांचे पालन करूनच अधिकृत वस्तूंची विक्री करावी. अन्यथा कठोर कारवाई घेण्यात येईल, असा इशारा अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी सातकर यांनी दिला.



