क्राईमगडचिरोलीविदर्भ

एटीएमच्या कव्हरवर पिन लिहिणे पडले महागात ; गडचिरोलीत बंद घर फोडून ६२ हजारांची चोरी

गडचिरोली : घराबाहेर जाताना आपण दारे-खिडक्या तर नीट बंद करतो, पण आपल्या बँक खात्याची ‘किल्ली’ सुरक्षित ठेवतो का? गडचिरोली शहरातील श्रीकृष्ण नगर भागात एका चोरीची अशीच आगळीवेगळी आणि तितकीच डोळे उघडणारी घटना समोर आली आहे. चोरट्याने घरातील दागिने किंवा मौल्यवान वस्तूंना हात न लावता केवळ एटीएम कार्ड चोरले आणि घरमालकाच्या एका चुकीचा फायदा घेत ६२ हजार रुपये लंपास केले.

श्रीकृष्ण नगर येथील रहिवासी आणि व्यवसायाने वास्तूविशारद (Architect) असलेले अंकुश रमेश चौधरी (३४) हे २० डिसेंबर रोजी वैयक्तिक कामासाठी नागपूरला गेले होते. घर बंद असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. ४ जानेवारी रोजी शेजाऱ्यांनी अंकुश यांना फोन करून घराचे कुलूप तुटल्याची माहिती दिली.

माहिती मिळताच अंकुश चौधरी यांनी गडचिरोली गाठून पोलिसांसह घराची पाहणी केली. विशेष म्हणजे, चोरट्याने घरातील इतर कोणत्याही साहित्याची चोरी न करता केवळ वडिलांच्या एटीएम (ATM) कार्डवर डल्ला मारला. बऱ्याचदा आपण विसरायला नको म्हणून एटीएम कार्डच्या कव्हरवर किंवा पाकिटावरच त्याचा पिन (PIN) क्रमांक लिहून ठेवतो. अंकुश चौधरी यांच्या घरीदेखील हेच घडले होते. चोरट्याला एटीएम कार्डसोबतच त्याचा पासवर्डही आयता मिळाल्याने त्याचे काम सोपे झाले.

कार्ड चोरीला गेल्यानंतर चोरट्याने मोठ्या हुशारीने वेगवेगळ्या तारखांना एटीएममधून पैसे काढले. १० जानेवारी रोजी २५,००० रुपये, ११ जानेवारी रोजी २५,००० रुपये आणि १८ जानेवारी रोजी १२,००० रुपये अशा प्रकारे एकूण ६२ हजार रुपये खात्यातून काढले गेले. मोबाईलवर विड्रॉलचे मेसेज आल्यानंतर चौधरी यांना या मोठ्या फसवणुकीचा धक्का बसला. याप्रकरणी त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गडचिरोली पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button