
नागपूरच्या तज्ज्ञांकडून ‘हर्निया’ व ‘हायड्रोसील’चे मोफत उपचार; दुर्गम भागातील पालकांना मोठा दिलासा
गडचिरोली : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम’ (RBSK) आणि ‘जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्र’ (DEIC) यांच्या संयुक्त विद्यमाने गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात बालकांसाठी विशेष शस्त्रक्रिया शिबिर पार पडले. ७ आणि ८ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित या दोन दिवसीय शिबिरामध्ये जन्मतः आजार असलेल्या एकूण ३४ बालकांवर यशस्वी शस्त्रक्रिया करून त्यांना नवजीवन देण्यात आले आहे.
या शिबिरासाठी नागपूर येथील ‘इंडियन असोसिएशन ऑफ पेडीऑंट्रिक सर्जन’ (IAPS) चमूतील प्रसिद्ध वरिष्ठ बाल शल्य चिकित्सक डॉ. मनीषा अलबल आणि वरिष्ठ बाल भूलतज्ज्ञ डॉ. मानसी अन्भारे यांनी विशेष सेवा दिली. जिल्हा महिला व बाल रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. माधुरी किलनाके यांनी या तज्ज्ञ चमूसह बालकांच्या शस्त्रक्रिया पूर्ण केल्या.

या दोन दिवसीय मोहिमेत जन्मजात आढळणारे विविध आजार व दोषांचे निवारण करण्यात आले: पहिला दिवस: १८ बालकांच्या शस्त्रक्रिया. दुसरा दिवस: १६ बालकांच्या शस्त्रक्रिया. आजारांचे स्वरूप: प्रामुख्याने हर्निया, हायड्रोसील, फायमोसीस व इतर गुंतागुंतीच्या आजारांवर यशस्वी उपचार करण्यात आले.
गडचिरोलीसारख्या अतिदुर्गम भागात अशा प्रकारच्या उच्चस्तरीय शस्त्रक्रियांची सुविधा उपलब्ध होणे पालकांसाठी मोठे वरदान ठरले आहे. एरवी अशा उपचारांसाठी नागपूर किंवा इतर मोठ्या शहरांत जावे लागते, ज्यामुळे आर्थिक आणि शारीरिक त्रास सोसावा लागतो. मात्र, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही सेवा जिल्ह्यातच उपलब्ध करून देण्यात आली.
शून्य ते १८ वर्षे वयोगटातील बालकांमधील जन्मजात आजार शोधण्यासाठी जिल्हाभरातील वैद्यकीय पथके काम करत आहेत. या बालकांना पुढील उच्चस्तरीय उपचारांसाठी ‘जिल्हा महिला व बाल रुग्णालय’ येथील ‘द्वितीयस्तरीय संदर्भसेवा कक्ष’ (DEIC) कडे पाठवले जाते. ‘जितके लवकर निदान, तितका लवकर उपचार’ या सूत्राचा अवलंब केल्यामुळे अनेक बालकांचे प्राण वाचवणे शक्य होत आहे.
या मोहिमेच्या नियोजनात अति. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. छाया उईके, बाह्य संपर्क अधिकारी डॉ. बागराज धुर्वे आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. माधुरी किलनाके यांचा महत्त्वाचा वाटा होता. तसेच शस्त्रक्रिया यशस्वी करण्यासाठी भूलतज्ज्ञ डॉ. नागसेन साखरे, सर्जन डॉ. कृणाल चेंडकापुरे, डॉ. मित्तल गेडाम, डॉ. समीर बनसोडे, ओटी इन्चार्ज नांदगाये सिस्टर व संपूर्ण ओटी चमूचे विशेष सहकार्य लाभले.
“बालकांमध्ये जन्मजात आजार असल्यास पालकांनी घाबरून न जाता तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालय किंवा जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्र (DEIC) येथे संपर्क साधावा. वेळीच केलेली तपासणी आणि उपचार बालकाच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत,” असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांनी केले आहे.



