गडचिरोलीविदर्भ

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात लोकाभिमुख उपक्रमातून अधिकाधिक पुरस्कार मिळवा – सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल

गडचिरोली : ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद यांनी आपल्या कार्यकौशल्याच्या माध्यमातून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत लोकाभिमुख उपक्रम प्रभावीपणे राबवून जास्तीत जास्त पुरस्कार मिळविण्याचे व गडचिरोली जिल्ह्याच्या नावे आदर्श निर्माण करण्याचे आवाहन राज्याचे वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी केले.

ग्रामविकास व पंचायत राज विभाग तसेच जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या वतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन आज येथील संस्कृति सभागृहात करण्यात आले होते. या कार्यशाळेत सहपालकमंत्री जयस्वाल यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थितांशी संवाद साधला.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी “गडचिरोली जिल्ह्यातील सर्व पंचायतांनी समन्वयाने आणि नियोजनबद्ध काम करावे, जेणेकरून जिल्ह्याला जास्तीत जास्त पुरस्कार मिळतील” असे सांगितले. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) पंकज भोयर, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सुयंवशी, प्रकल्प संचालक दादासाहेब वानखेडे, डॉ. साळवे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी आदी मान्यवरांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

या अभियानांतर्गत ग्रामपंचायतींना तालुका स्तरावर प्रथम क्रमांकासाठी १५ लाख, द्वितीय १२ लाख, तृतीय ८ लाख तसेच दोन विशेष ग्रामपंचायतींना प्रत्येकी ५ लाख इतके रोख पारितोषिक मिळणार आहे. जिल्हा स्तरावर प्रथम ५० लाख, द्वितीय ३० लाख व तृतीय २० लाख इतके पुरस्कार निश्चित करण्यात आले आहेत. विभागीय स्तरावर प्रथम १ कोटी, द्वितीय ८० लाख व तृतीय ६० लाख, तर राज्यस्तरावर ग्रामपंचायतींना प्रथम ५ कोटी, द्वितीय ३ कोटी व तृतीय २ कोटींचे भव्य पुरस्कार देण्यात येणार आहेत. पंचायत समितीसाठी विभागीय स्तरावर प्रथम १ कोटी, द्वितीय ७५ लाख व तृतीय ६० लाख तर राज्यस्तरावर २ कोटी, १.५ कोटी व १.२५ कोटींचे पुरस्कार निश्चित आहेत. जिल्हा परिषदेसाठी राज्यस्तरीय प्रथम ५ कोटी, द्वितीय ३ कोटी व तृतीय २ कोटींचा प्रोत्साहन निधी ठेवण्यात आला आहे.

कार्यक्रमाचे संचालन शेषराव नागमोती यांनी केले. प्रास्ताविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.प.) पंकज भोयर यांनी केले, तर आभार प्रदर्शन कनिष्ठ प्रशासन अधिकारी अखिल श्रीरामवार यांनी मानले. पंचायत विभाग, जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

कार्यक्रमाला महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी दीपक बनाईत, सर्व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, महिला व बालविकास अधिकारी, सरपंच, विस्तार अधिकारी पंचायत, ग्रामपंचायत अधिकारी, उमेद कर्मचारी, राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियान, अस्क व पेसा योजनेचे तालुका व्यवस्थापक तसेच पंचायत विभाग जिल्हा परिषद गडचिरोली येथील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button