
पंतप्रधानांच्या संकल्पनेतील मोहिमेला अर्जुनी मोरगाव तालुक्यात गती; गर्भाशय मुखाच्या कर्करोगाला रोखण्यासाठी पालकांना पुढाकार घेण्याचे आवाहन.
गोंदिया : देशातील महिलांमध्ये वेगाने वाढणाऱ्या गर्भाशय मुखाच्या कर्करोगाला (Cervical Cancer) मुळापासून उपटून टाकण्यासाठी केंद्र सरकारने विशेष पाऊल उचलले आहे. याच पार्श्वभूमीवर, प्राथमिक आरोग्य केंद्र गोठणगाव येथे जनआरोग्य समितीची विशेष सभा पार पडली. या सभेमध्ये क्षेत्रातील १४ ते १५ वर्ष वयोगटातील १०० टक्के मुलींना ‘एचपीव्ही’ (HPV) लस टोचून त्यांचे आरोग्य सुरक्षित करण्याचा ठाम निर्धार लोकप्रतिनिधी आणि आरोग्य प्रशासनाने केला आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २८ फेब्रुवारी रोजी अजमेर (राजस्थान) येथून या राष्ट्रीय लसीकरण मोहिमेचा शुभारंभ केला होता. याच धर्तीवर गोठणगाव येथे झालेल्या सभेत जिल्हा परिषद सदस्य तथा माजी उपाध्यक्ष यशवंतजी गणवीर यांनी पालकांना आवाहन केले की, “लसीकरणाबाबत मनात कोणतीही भीती किंवा शंका न बाळगता पालकांनी आपल्या मुलींचे लसीकरण करून घ्यावे. हे एक ‘सुरक्षा कवच’ असून यामुळे मुलींचे भविष्य सुरक्षित होणार आहे.”
अर्जुनी मोरगाव पंचायत समितीच्या सभापती आम्रपाली डोंगरवार यांनी नमूद केले की, भारतात महिलांमध्ये आढळणारा हा दुसरा सर्वात मोठा कर्करोग आहे. वयाच्या ९ ते १४ किंवा १५ वर्षांच्या दरम्यान ही लस घेतल्यास तिची प्रभावीकता सर्वाधिक असते.
वैद्यकीय अधिकारी डॉ. देवेंद्र घरतकर आणि प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कविश्वर किरसान यांनी लसीचे महत्त्व पटवून दिले. “एचपीव्ही लस ही अत्यंत सुरक्षित आणि प्रभावी आहे. लैंगिकदृष्ट्या सक्रिय होण्यापूर्वी ही लस शरीरात आवश्यक रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करते, ज्यामुळे भविष्यात कर्करोगाचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो,” अशी तांत्रिक माहिती डॉ. घरतकर यांनी दिली.
या सभेला जिल्हा परिषद सदस्य कविताताई कापगते, सरपंच संजय ईश्वार, उपसरपंच कांतीलाल डोंगरवार, संतोष मिर्धा, माजी जि.प. सदस्य रतिरामजी राणे, सामाजिक कार्यकर्ते सौरभजी पशिने यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते.
आरोग्य केंद्रातील संपूर्ण चमू, ज्यामध्ये डॉ. खोब्रागडे, समुदाय आरोग्य अधिकारी गौरव टेंभेकर, तृप्ती गहाणे, आरोग्य सहाय्यक संतोष पारधी आणि इतर कर्मचाऱ्यांनी गावपातळीवर घरोघरी जाऊन जनजागृती करण्याचा संकल्प केला आहे. आशा गट प्रवर्तक आणि आरोग्य सेविकांमार्फत पालकांमधील गैरसमज दूर करण्यासाठी विशेष समुपदेशन सत्रे आयोजित केली जाणार आहेत. आरोग्य विभागाच्या या सक्रियतेमुळे आणि लोकप्रतिनिधींच्या पाठबळामुळे गोठणगाव परिसरात या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळण्याची चिन्हे आहेत.



