
निवडणुकीत राबणाऱ्या कार्यकर्त्यांचे मानले आभार ; ‘स्वच्छ आणि सुरक्षित शहर‘ निर्मितीसाठी नव्या उत्साहाने कामाला सुरुवात
गडचिरोली : नवीन वर्षाच्या स्वागताचा जल्लोष सुरू असतानाच, गडचिरोली शहराच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रणोती निंबोरकर यांनी शहरातील सर्व नागरिकांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. केवळ शुभेच्छाच नव्हे, तर आगामी वर्षात गडचिरोली शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी नव्या जोमाने कार्य करण्याचा संकल्पही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
आपल्या शुभेच्छा संदेशात नगराध्यक्षांनी शहराच्या भविष्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. त्या म्हणाल्या, “नवीन वर्ष म्हणजे केवळ दिनदर्शिकेचे पान बदलणे नव्हे, तर नव्या आशा आणि नव्या संकल्पांची सुरुवात आहे. गडचिरोली शहराचा सर्वांगीण विकास, प्रत्येक वॉर्डातील स्वच्छता, महिला व नागरिकांची सुरक्षितता आणि प्रगती हेच माझे मुख्य प्राधान्य आहे. या उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी मी पूर्ण ताकदीने आणि नव्या उत्साहाने कार्य करणार आहे.”
नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये मिळालेल्या विजयाचे श्रेय त्यांनी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या सहकाऱ्यांना दिले. “दिवस-रात्र मेहनत करणाऱ्या सर्व पदाधिकारी, निष्ठावंत कार्यकर्ते आणि सहकाऱ्यांमुळेच आज मला जनतेची सेवा करण्याची ही बहुमानाची संधी मिळाली आहे,” अशा शब्दांत त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. सामान्य जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ न देता, त्यांच्या प्रश्नांसाठी सदैव तत्पर राहण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.
नवीन वर्षात प्रत्येक गडचिरोलीकराच्या आयुष्यात आरोग्य, सुख, समाधान आणि यश नांदावे, अशी प्रार्थना त्यांनी ईश्वरचरणी केली. आपले शहर अधिक सक्षम, सुंदर आणि प्रगतीशील व्हावे, हाच आपला ध्यास असल्याचे त्यांनी नमूद केले. नगराध्यक्षांच्या या सकारात्मक संदेशामुळे शहरात उत्साहाचे वातावरण आहे. “जनतेसोबत आणि जनतेसाठी विकासाच्या मार्गावर सदैव” हा त्यांचा विश्वास पुन्हा एकदा अधोरेखित झाला असून, नागरिकांनीही त्यांच्या या विकासाच्या संकल्पाचे स्वागत केले आहे.



