
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांनी स्वतः हाताळल्या सर्व केसेस ; पोटावर अवघ्या एका छिद्राद्वारे विनावेदनेची ‘सिंगल पंक्चर’ शस्त्रक्रिया ठरतेय वरदान
गडचिरोली : जिल्ह्यातील दुर्गम आणि आदिवासी भागातील महिलांना महानगरांच्या तोडीची अत्याधुनिक आरोग्य सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देण्याच्या दिशेने जिल्हा आरोग्य विभागाने एक ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. मुलचेरा येथील ग्रामीण रुग्णालयात आयोजित विशेष मोहिमेदरम्यान एकाच दिवसात तब्बल २७ मातांवर ‘सिंगल पंक्चर लॅप्रोस्कोपिक ट्युबल लिगेशन’ अर्थात दुर्बिनद्वारे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया अत्यंत यशस्वीरीत्या पार पडल्या.
गडचिरोली जिल्हा आणि विशेषतः मुलचेरा तालुक्याच्या वैद्यकीय इतिहासात अशा प्रकारच्या अत्याधुनिक शस्त्रक्रियांचे हे पहिलेच मोठे यश मानले जात असून, ग्रामीण आरोग्य सेवेच्या बळकटीकरणातील हा एक सुवर्ण टप्पा ठरला आहे.
या संपूर्ण विशेष शस्त्रक्रिया मोहिमेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे याचे नेतृत्व स्वतः जिल्हा शल्यचिकित्सक तथा प्रख्यात स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. वर्षा लहाडे यांनी केले. केवळ प्रशासकीय मार्गदर्शनापुरते मर्यादित न राहता, त्यांनी स्वतः ऑपरेशन थिएटरमध्ये उतरून सर्व २७ मातांच्या शस्त्रक्रिया अत्यंत कौशल्याने आणि सुरक्षितपणे पूर्ण केल्या. त्यांच्या या तत्परतेमुळे आणि तज्ज्ञ चमूच्या समन्वयामुळे ही आव्हानात्मक मोहीम फत्ते झाली.
या मोहिमेत डॉ. स्मिता साळवे यांनी संपूर्ण प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेत शस्त्रक्रिया यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान दिले. तर शस्त्रक्रियेदरम्यान अत्यंत संवेदनशील असणारी भूल देण्याची जबाबदारी भूलतज्ज्ञ डॉ. समीर बनसोडे यांनी चोख बजावली. सुंदरनगर प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ग्रामीण भागात विशेष प्रयत्न करून पात्र महिलांचे अचूक समुपदेशन केले व त्यांना या अत्याधुनिक शस्त्रक्रियेसाठी प्रोत्साहित केले.
‘सिंगल पंक्चर’ लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया ही वैद्यकीय क्षेत्रातील अत्यंत आधुनिक, सुरक्षित आणि सुलभ कुटुंब नियोजन पद्धती मानली जाते. या प्रक्रियेत पोटावर कोणताही मोठा काप न देता केवळ एक लहान छिद्र करून दुर्बिनच्या साहाय्याने शस्त्रक्रिया केली जाते. यामुळे अंतर्गत किंवा बाह्य रक्तस्त्राव अत्यल्प होतो, शरीरावर टाके पडत नाहीत आणि वेदना नगण्य असतात. पारंपारिक शस्त्रक्रियेच्या तुलनेत या पद्धतीमध्ये महिला अतिशय वेगाने बऱ्या होतात आणि अगदी कमी दिवसांत आपल्या दैनंदिन घरगुती व शेतीच्या कामांत परतू शकतात. दुर्गम भागातील कष्टकरी महिलांसाठी ही पद्धत वरदान ठरत आहे.
मुलचेरा ग्रामीण रुग्णालयातील परिचारिका, औषध निर्माते, आरोग्य कर्मचारी आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी रात्रंदिवस मेहनत घेऊन या शिबिराचे चोख व्यवस्थापन केले. या यशाबद्दल बोलताना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा लहाडे म्हणाल्या, “ग्रामीण व आदिवासी भागातील महिलांना सुरक्षित, प्रभावी आणि अत्यंत कमी त्रासदायक कुटुंब नियोजन सेवा देणे हे आमचे मुख्य ध्येय आहे. मुलचेरा येथील मातांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता, आता या ‘सिंगल पंक्चर लॅप्रोस्कोपिक’ मोहिमेचा विस्तार संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात केला जाईल.”
जिल्ह्यातील प्रत्येक दुर्गम व अतिदुर्गम गावातील शेवटच्या महिलेपर्यंत ही अत्याधुनिक आरोग्य सेवा पोहोचविण्यासाठी आरोग्य प्रशासनाने आतापासूनच विशेष कृती आराखडा तयार केला आहे.



