
‘नेत्र हेच जीवनाचे खरे दालन’ – माजी खा. डॉ. अशोक नेते
गडचिरोली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात राबविण्यात येत असलेल्या “सेवा सुशासन, गरीब कल्याण – सेवा पंधरवडा” या उपक्रमाअंतर्गत गडचिरोली शहरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने भव्य नेत्र तपासणी आरोग्य शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. हे शिबिर आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या कर्तव्यदक्ष कार्यालयात पार पडले.
या शिबिराचे उद्घाटन माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोक नेते यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. डॉ. नेते यांनी स्वतः आपल्या नेत्रांची तपासणी करत नागरिकांना डोळ्यांच्या आरोग्याबाबत जागरूक राहण्याचे आवाहन केले. डॉ. नेते म्हणाले, “नेत्र हेच जीवनाचे खरे दालन आहेत. जगण्याचा प्रत्येक क्षण आपण डोळ्यांतून अनुभवतो. मोतीबिंदू, अंधुक दिसणे असे आजार टाळण्यासाठी वेळोवेळी नेत्र तपासणी आवश्यक आहे. प्रत्येक नागरिकांनी आपल्या नेत्रांची योग्य ती काळजी घ्यावी, हीच खरी सेवा आहे.”
या शिबिरात शेकडो नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत मोफत नेत्र तपासणी करून घेतली. तज्ज्ञ डॉक्टर्सनी उपस्थितांना नेत्र आजारांविषयी सविस्तर माहिती देत मार्गदर्शन केले. यावेळी आमदार डॉ. मिलिंद नरोटे, भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बाबुराव कोहळे, भाजप नेत्या डॉ. चंदा कोडवते, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, गोविंद सारडा, महिला मोर्चा जिल्हा अध्यक्षा योगिता पिपरे, शहराध्यक्ष अनिल कुनघाडकर यांच्यासह भाजपचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गडचिरोली शहरात आयोजित हे नेत्र तपासणी शिबिर म्हणजे सेवा पंधरवड्याला दिलेले एक अर्थपूर्ण योगदान ठरले. समाजाच्या आरोग्य संवर्धनासाठी अशा उपक्रमांची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली.



