‘संपूर्णतः’ अभियानातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल गडचिरोलीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव

आहेरी तालुक्याने ४, तर भामरागडने ३ निर्देशांकांमध्ये मिळवले १००% उद्दिष्ट ; आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते सन्मान
गडचिरोली : भारत सरकारच्या नीती आयोगामार्फत राबविण्यात येणाऱ्या आकांक्षित जिल्हा व तालुका कार्यक्रमांतर्गत, जुलै ते सप्टेंबर २०२४ या कालावधीत घेण्यात आलेल्या ‘संपूर्णतः अभियानात’ उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील विविध विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव सोहळा येथील सुमानंद सभागृहात नुकताच पार पडला.
या सन्मान सोहळ्याला आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके, विधान परिषद सदस्य सुधाकर अडबाले, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, माजी आमदार नामदेव उसेंडी, माजी खासदार डॉ. अशोक नेते, नागपूर आदिवासी विभागाच्या अपर आयुक्त आयुषी सिंह, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे आणि तीनही प्रकल्प अधिकारी उपस्थित होते.
‘संपूर्णतः’ अभियानात अहेरी तालुक्याने ६ पैकी ४ आणि भामरागडने ६ पैकी ३ निर्देशांकांमध्ये १००% संपृक्तता प्राप्त केली. या अतुलनीय कामगिरीसाठी गटविकास अधिकारी (अहेरी व भामरागड) यांना नीती आयोगाने अनुक्रमे ‘कांस्य’ व ‘ताम्र’ पदक प्रदान केले. आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी १००% उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या शिक्षण व आरोग्य विभागाचा विशेष सत्कार करण्यात आला. यामध्ये शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा नियोजन अधिकारी यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यासोबतच, अहेरी, भामरागड आणि सिरोंचा तालुक्यांतील तालुका आरोग्य अधिकारी, एएनएम, आशा सेविका, कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक, बाल विकास प्रकल्प अधिकारी आणि अंगणवाडी सेविका यांचाही त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मान करण्यात आला.

‘वोकल फॉर लोकल’ या संकल्पनेला बळकटी देण्यासाठी जिल्ह्यातील बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘आकांक्षा हाट’ या विशेष स्टॉलचे उद्घाटन मंत्री डॉ. अशोक उईके आणि आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या हस्ते करण्यात आले. भामरागड, अहेरी, सिरोंचा, एटापल्ली, आरमोरी, धानोरा आणि कुरखेडा येथून आलेल्या महिलांनी लाकडी व बांबू वस्तू, रानभाजी, कापडी सॅनिटरी पॅड, मोहा-नाचणी लाडू, लोणची आणि मसाले अशा पारंपरिक व पौष्टिक उत्पादनांचे स्टॉल लावले होते. जिल्हा प्रशासनाच्या या उपक्रमाला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.



