गडचिरोलीविदर्भ

देवापुर ग्रामपंचायतीत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज व ‘माझे गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियान ; ५४८ नागरिकांनी आरोग्य शिबिरासह घेतला विविध योजनांचा लाभ

कौशल्य विकास, समाज कल्याण आणि मत्स्य विभागाचा पुढाकार; १८ ते ४५ वयोगटातील तरुणांना मिळणार मोफत प्रशिक्षण

गडचिरोली : तालुक्यातील देवापूर ग्रामपंचायतीमध्ये ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ आणि ‘माझे गाव आरोग्य संपन्न गाव’ या विशेष मोहिमेचा नुकताच उत्साहात शुभारंभ करण्यात आला. समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन मडावी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या कार्यक्रमात आरोग्य तपासणीसह शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ एकाच छताखाली देण्यात आला. या उपक्रमात परिसरातील नऊ गावांतील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

या अभियानांतर्गत गावाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध विभागांनी महत्त्वाच्या योजनांची घोषणा केली आहे. कौशल्य विकास विभाग: १८ ते ४५ वयोगटातील युवक-युवतींना मोफत कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. समाज कल्याण विभाग: गावात अद्ययावत वाचनालय उभारण्यासोबतच महिलांच्या आरोग्यासाठी विशेष सुविधा असलेले ‘मावा आसकंना लोन’ केंद्र उभारले जाणार आहे. मत्स्य विकास विभाग: तलावांचे खोलीकरण आणि मत्स्य व्यावसायिकांना मोफत विमा संरक्षण देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाच्या मुख्य आकर्षण असलेल्या आरोग्य शिबिरात ५४८ नागरिकांनी लाभ घेतला. यामध्ये महिला, बालके, गर्भवती मातांची तपासणी, डोळ्यांचे आजार आणि सिकलसेल चाचणी करण्यात आली. ४५ नागरिकांना ‘आयुष्मान भारत’ कार्डांचे वाटप करण्यात आले. २२ ज्येष्ठ नागरिकांची ‘वय वंदन’ योजनेअंतर्गत नोंदणी करण्यात आली.

यावेळी कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेंद्र शेंडे, मत्स्य विकासचे सहाय्यक आयुक्त श्री. डोंगरे, सरपंच शिवाजी गावडे, ग्रामसेवक संजय नैताम तसेच सुधाकर दुगा, विलास पोटावी आणि दिनेश किरंगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

रुग्णांच्या तपासणीसाठी डॉ. प्रियंका शेडमाके, डॉ. आशीष शेडमाके, डॉ. मनोहर मडावी, डॉ. नितीन मसराम, डॉ. उईके (PHC पोटेगाव), डॉ. लालाजी वट्टी व डॉ. शानगोंडा यांनी सेवा दिली. नेहाल भानारकर व संतोष कुकडकर यांनी आरोग्यमित्र म्हणून सहकार्य केले. “देवापूरला एक आदर्श गाव म्हणून विकसित करण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी एकजुटीने काम करण्याचा निर्धार यावेळी केला. नियोजित उपक्रमांमुळे गावाच्या आरोग्यासोबतच आर्थिक सक्षमीकरणालाही मोठी गती मिळणार आहे.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button