
विद्यार्थिनींना विशाखा मार्गदर्शक तत्त्वे व कायदेशीर प्रक्रियांची माहिती ; तक्रार न घाबरता नोंदवण्याचे आवाहन
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीच्या पदव्युत्तर इंग्रजी विभागातर्फे नुकतेच “महिला तक्रार निवारण समिती: विद्यार्थिनींसाठी माहिती सत्र” या विषयावर एका महत्त्वाच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. विद्यापीठातील विद्यार्थिनींमध्ये सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करणे आणि विद्यापीठात कार्यरत असलेल्या तक्रार निवारण यंत्रणेची सविस्तर माहिती देणे हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता.
या कार्यशाळेला गोंडवाना विद्यापीठाच्या महिला तक्रार निवारण समितीच्या सदस्या डॉ. शिल्पा आठवले यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहून विद्यार्थिनींना सविस्तर मार्गदर्शन केले. डॉ. आठवले यांनी विद्यापीठात विद्यार्थिनींसाठी सुरक्षित आणि सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी समितीची भूमिका किती महत्त्वाची आहे, यावर प्रकाश टाकला. त्यांनी शारीरिक, मानसिक, लैंगिक किंवा छळवणुकीसंदर्भात तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया, समितीची कार्यपद्धती, तसेच विशाखा मार्गदर्शक तत्त्वे आणि कायदेशीर तरतुदी यांची सविस्तर माहिती विद्यार्थिनींसमोर ठेवली.
डॉ. आठवले यांनी विद्यार्थिनींना कोणताही अन्याय सहन न करता तत्काळ योग्य ठिकाणी तक्रार नोंदविण्याचे आवाहन केले आणि विद्यापीठ प्रशासन विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत असल्याचे स्पष्ट केले.
या माहिती सत्रामध्ये विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. त्यांनी तक्रार प्रक्रियेविषयी असलेल्या शंका विचारून त्यांचे निरसन करून घेतले. या सत्रास इंग्रजी विभागाचे विभाग प्रमुख प्रो. विवेक जोशी यांनी अध्यक्ष म्हणून मार्गदर्शन केले, तर डॉ. वैभव मसराम, डॉ. प्रमोद जावरे, डॉ. अतुल गावस्कर आणि इंग्रजी विभागातील विद्यार्थ्यांनी यशस्वी आयोजनात सक्रिय सहभाग घेतला.



