
कांद्री आरटीओ नाक्यावर एसीबीचा छापा; ४.३१ लाखांची रोख जप्त
नागपूर : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB), नागपूरने बुधवारी (११ मार्च) रात्री उशिरा नागपूर-देवलापार मार्गावरील कांद्री येथील आरटीओ सीमा तपासणी नाक्यावर सापळा रचून मोटर वाहन निरीक्षक अभिजित मधुकर टाले आणि त्यांचा खाजगी एजंट सुशिल विनोद रामटेककर यांना १००० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली. या कारवाईत नाक्यावरील कार्यालयातून ४ लाख ३१ हजार २९० रुपयांची संशयास्पद रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
तक्रारदार हे व्यवसायाने वाहन चालक असून ते त्यांच्या मालकाचा ट्रेलर चालवतात. कांद्री येथील आरटीओ चेकपोस्टवरून ट्रेलर पास करण्यासाठी तेथील अधिकारी आणि त्यांचे खाजगी एजंट प्रत्येक वाहनामागे १००० ते १५०० रुपयांची बेकायदा मागणी करत असल्याची तक्रार त्यांनी नागपूर एसीबीकडे केली होती. या तक्रारीची शिताफीने शहानिशा केल्यानंतर एसीबीने सापळा रचला.
तक्रारदार आपला ट्रेलर घेऊन नागपूरहून देवलापारकडे जात असताना, कांद्री नाक्यावर खाजगी एजंट सुशिल रामटेककर याने मोटर वाहन निरीक्षक अभिजित टाले यांच्या सांगण्यावरून ट्रेलर पास करण्यासाठी १००० रुपयांची मागणी केली. पंचांच्या समक्ष ही लाचेची रक्कम स्वीकारताच दबा धरून बसलेल्या एसीबी पथकाने झडप घालून दोघांनाही ताब्यात घेतले.
दोन्ही आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर एसीबी पथकाने चेकपोस्टवरील कार्यालयाची कसून झडती घेतली. यावेळी सरकारी तिजोरीव्यतिरिक्त तब्बल ४,३१,२९० रुपये नगदी स्वरूपात मिळून आले. ही रक्कम अवैध वसुलीतून जमा करण्यात आल्याचा संशय असून, त्यादृष्टीने तपास सुरू आहे.
ही धडक कारवाई एसीबीचे पोलीस अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान, अपर पोलीस अधीक्षक माधुरी बाविस्कर आणि विजय माहुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सापळा अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक राजकिरण येवले यांनी काम पाहिले, तर पथकात पोलीस निरीक्षक जितेंद्र वैरागडे, भरत ठाकूर, दिपाली भगत आणि होमेश्वर वाईलकर यांचा समावेश होता.
सध्या या दोन्ही आरोपींविरुद्ध रामटेक पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून, या रॅकेटमध्ये अजून किती अधिकारी गुंतलेले आहेत, याचा सखोल तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग करत आहे.



