
शेतकऱ्यांची सुपीक जमीन अधिग्रहित करणे अन्यायकारक ; पर्यायी जागेची मागणी
गडचिरोली : येथील विमानतळासाठी शेतकऱ्यांची सुपीक जमीन अधिग्रहित करण्याचा निर्णय रद्द करावा, या मागणीसाठी शेती बचाव संघर्ष समितीने येथे सुरू केलेल्या उपोषण आंदोलनाला अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाने पाठिंबा जाहीर केला आहे.
रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत आणि जिल्हाध्यक्ष हंसराज उंदीरवाडे यांनी शेतकऱ्यांच्या उपोषणस्थळी प्रत्यक्ष भेट देऊन आपला पाठिंबा व्यक्त केला. विमानतळासाठी शेतकऱ्यांची सुपीक आणि उत्पादक जमीन अधिग्रहित करणे पूर्णपणे चुकीचे आणि अन्यायकारक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. या निर्णयामुळे मुरखडा, पुलखाल, कनेरी, मुडझा इत्यादी गावांतील साडेतीनशेहून अधिक शेतकऱ्यांचे जीवन पूर्णपणे उद्ध्वस्त होणार असून, त्यांच्या तोंडातील घास हिरावून घेतला जाणार आहे, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे शासनाने जमीन अधिग्रहणाचा निर्णय त्वरित रद्द करावा आणि विमानतळासाठी पर्यायी जागा शोधावी, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाने केली आहे.
“आमचा पक्ष नेहमीच शेतकरी, शेतमजूर आणि कष्टकरी लोकांच्या पाठीशी उभा राहिलेला आहे आणि या आंदोलनातही आम्ही शेतकऱ्यांसोबत पूर्ण ताकदीने उभे राहू,” असे रोहिदास राऊत यांनी यावेळी सांगितले.
या भेटीदरम्यान सामाजिक कार्यकर्त्या कुसुमताई अलाम, विलास निंबोरकर, हरिदास कोटरंगे, शेतकरी नेते शरद पाटील ब्राह्मणवाडे, योगेश सोनुले, प्रभाकर वडपल्लीवार आणि विमानतळग्रस्त अनेक शेतकरी उपस्थित होते.



