गडचिरोलीविदर्भ

खेळांमुळे व्यसनांपासून मुक्ती मिळते आणि जीवन आनंददायी होते – सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल

चामोर्शी येथे ‘नेताजी कप फुटबॉल स्पर्धा २०२५‘ चे उद्घाटन ; आमदार मिलिंद नरोटे यांनी ५ लाखांची मदत केली जाहीर

गडचिरोली : खेळ केवळ शारीरिक तंदुरुस्तीच देत नाहीत, तर व्यक्तीला व्यसनांपासून दूर ठेवून जीवनात आनंद वाढवतात, असे मत राज्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी व्यक्त केले. चामोर्शी तालुक्यातील सुभाषग्राम येथे त्यांच्या हस्ते ‘नेताजी कप फुटबॉल स्पर्धा २०२५’ चे उद्घाटन झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार डॉ. मिलिंद नरोटे प्रामुख्याने उपस्थित होते.

मंत्री जयस्वाल यांनी खेळाचे जीवनातील महत्त्व सांगताना, नागपूरच्या दिव्या देशमुखने जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत मिळवलेल्या यशाचे उदाहरण दिले. हे यश तरुण पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे ते म्हणाले. शासनातर्फे खेळांना मोठे प्रोत्साहन दिले जात आहे आणि यापुढेही दिले जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. तसेच, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नावाने येथील क्रीडांगण विकसित करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

आमदार डॉ. मिलिंद नरोटे म्हणाले की, “खेळाडू घडले तर समाज घडतो आणि समाज घडला तर राष्ट्र बळकट होते.” क्रीडा ही केवळ एक स्पर्धा नसून ती व्यक्तिमत्त्व विकासाची शाळा आहे, असे सांगत त्यांनी ग्रामीण भागातील क्रीडा परंपरा जपण्याची गरज व्यक्त केली. नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी आमदार निधीतून ५,००,००० रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली.

यावेळी डॉ. अशोक नेते, अनिल पोहनकर, राकेश सरकार, रवींद्र ओल्लारवार, नामदेव सोनटक्के यांच्यासह मोठ्या संख्येने क्रीडाप्रेमी उपस्थित होते. या स्पर्धेत राज्यभरातील अनेक नामांकित फुटबॉल संघ सहभागी झाले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button