गडचिरोलीविदर्भ

चामोर्शीत ‘ई-पीक पाहणी’च्या दिरंगाईमुळे शेतकरी अडचणीत

१०० टक्के पाहणीसाठी तहसीलदारांनी तात्काळ कार्यवाही करावी ; राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे डॉ. प्रणय खुणे यांची मागणी

चामोर्शी : तालुक्यातील शेकडो गावांमध्ये तहसील कार्यालयाच्या दिरंगाईमुळे आतापर्यंत दहा टक्के शेतकऱ्यांचीही ई-पीक पाहणी पूर्ण झालेली नाही. यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून, धान विक्रीसाठी आणि इतर कामांसाठी सातबारा ऑनलाईन न झाल्यामुळे नाहक त्रास होत आहे. या गंभीर समस्येवर तात्काळ कार्यवाही करून ई-पीक पाहणी १०० टक्के पूर्ण करण्याची मागणी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे यांनी केली आहे.

राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेने चामोर्शी तहसील कार्यालयात तहसीलदार घारुडे यांना निवेदन देऊन या प्रश्नाकडे लक्ष वेधले. ई-पीक पाहणी पूर्ण न झाल्यामुळे शेतकऱ्यांना आदिवासी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेत (विविस) धान विक्री करताना सातबारा ऑनलाईन होत नाही. यामुळे धान विक्री खोळंबली आहे. अनेक शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी केलेली असतानाही ती पोर्टलवर दिसत नसल्याने त्यांना दुसऱ्यांदा फेर ई-पीक पाहणी करावी लागत आहे. ई-पीक पाहणी पूर्ण करण्याबाबत स्थानिक तलाठी आणि कोतवाल उदासीन असल्याचे चित्र तालुक्यात दिसत आहे.

डॉ. प्रणय खुणे यांनी तहसीलदार यांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सर्व मंडळ अधिकारी, तलाठी, कोतवाल व सहाय्यक यांची समन्वय बैठक घेऊन चामोर्शी तालुक्यातील ई-पीक पाहणी तात्काळ १०० टक्के पूर्ण करावी, अशी मागणी केली आहे. राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी यांनी तहसीलदार घारुडे यांना निवेदन दिले. यावेळी युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष विनोद कीरमे, संघटना तालुका सचिव संतोष बुरांडे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button