
लग्नासाठी कुटुंब बाहेर गेल्याची संधी साधून केली चोरी
भद्रावती : ज्या मित्रावर विश्वास टाकला, त्यानेच विश्वासाला तडा देत मित्राचे घर फोडल्याचा धक्कादायक प्रकार भद्रावती पोलिसांनी उघडकीस आणला आहे. आपल्या मित्राच्या गैरहजेरीत त्याच्या घरातून सोन्याचे दागिने आणि साडेतीन लाखांची रोकड लंपास करणाऱ्या आरोपी मित्राला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून, त्याच्याकडून चोरीचा संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. बंटी सुभाषचंद्र बद्रा (४४, रा. खापरखेडा, जि. नागपूर; हल्ली मु. भद्रावती), असे आरोपी मित्राचे नाव आहे.
भद्रावती येथील देवालय कॉलनीतील रहिवासी तनुज अनिल पंढीले (३०) हे १८ डिसेंबर रोजी सकाळी आपल्या कुटुंबासह यवतमाळ येथे एका लग्नासाठी गेले होते. रात्री ८ वाजेच्या सुमारास जेव्हा ते घरी परतले, तेव्हा त्यांना घराचे कुलूप तुटलेले दिसले. घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचे हातातील ब्रासलेट आणि पर्समधील ३ लाख ५० हजार रुपये रोख रक्कम चोरीला गेली होती. घरात मोठी चोरी झाल्याचे लक्षात येताच पंढीले यांनी तातडीने भद्रावती पोलीस ठाण्यात धाव घेतली.
पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम ३०५ (अ), ३३१ (३) आणि ३३१ (४) अंतर्गत गुन्हा दाखल केला. तपासादरम्यान पोलिसांना संशयित म्हणून फिर्यादीच्या मित्रावर, बंटी बद्रा (४४) याच्यावर संशय आला. पोलिसांनी संशयावरून बंटीला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता, सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या बंटीने अखेर आपला गुन्हा कबूल केला. त्यानेच मित्राचे घर कुलूपबंद असल्याचे पाहून चोरी केल्याचे मान्य केले.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, एसडीपीओ संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी, एपीआय संजय मिश्रा, गजानन तुपकर, महेंद्र बेसरकर, अनुप आष्टुनकर, जगदीश झाडे, विश्वनाथ चुदरी आदींनी केली.
जिवलग मित्रानेच अशा प्रकारे घरफोडी केल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे. “बाहेरगावी जाताना मौल्यवान वस्तू घरात ठेवू नका आणि घराची सुरक्षितता तपासा,” असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.



