सी-६० जवानाच्या हत्येप्रकरणी चार जहाल नक्षलवाद्यांना अटक

चौघांवर होते ४० लाखांचे बक्षीस ; गडचिरोली पोलीस आणि सीआरपीएफ दलाची संयुक्त कारवाई
गडचिरोली : जिल्ह्यातील भामरागड उपविभागात दिरंगी फुलनार जंगल परिसरात फेब्रुवारी महिन्यात झालेल्या चकमकीत सी-60 जवानाचा बळी गेला होता, या घटनेतील मुख्य आरोपी असलेल्या चार जहाल नक्षलवाद्यांना गडचिरोली पोलिस आणि सीआरपीएफ दलाच्या संयुक्त कारवाईत अटक करण्यात आली आहे. या चार नक्षल्यांवर एकूण ४० लाखांचे बक्षीस जाहीर होते. या अटकेमुळे गडचिरोली जिल्ह्यात नक्षल्यांना मोठा फटका बसला आहे
पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या नेतृत्वाखाली आणि विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील व पोलीस उपमहानिरीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. अटक केलेल्या नक्षल्यांमध्ये दक्षिण गडचिरोली विभागीय समितीचा सचिव सायलु भुमय्या ऊर्फ रघु, त्याची पत्नी व भामरागड एरिया कमिटीची सचिव जैनी खराटम, तसेच झाशी तलांडी व मनिला गावडे या भामरागड दलमच्या महिला सदस्यांचा समावेश आहे.
सायलु याच्यावर तब्बल ७७ गुन्हे नोंद आहेत. त्यामध्ये ३४ चकमकी, २३ खून, ७ जाळपोळ यांचा समावेश आहे. तर जैनीवर २९ गुन्हे नोंद असून १८ चकमकी व ४ खून त्यात आहेत. उर्वरित दोन महिलांवरही अनेक गंभीर गुन्हे नोंदवले गेले आहेत.
भामरागड तालुक्यातील पल्ली जंगल परिसरात हे नक्षलवादी रेकी करत असताना सीआरपीएफच्या 09 बटालियन व ताडगाव पोलीस ठाण्याच्या पथकाने त्यांना संशयास्पद हालचाली करताना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी आपल्या ओळखी कबूल केल्या. या चार नक्षल्यांवर एकूण ४० लाखांचे बक्षीस जाहीर होते. सायलुवर २० लाख, जैनीवर १६ लाख तर झाशी व मनिलावर प्रत्येकी २ लाखांचे बक्षीस होते.
या कारवाईनंतर पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी नक्षल्यांचा हिंसक मार्ग सोडून आत्मसमर्पण करण्याचे आवाहन केले असून, गडचिरोलीत नक्षलवाद विरोधी कारवाया अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे संकेत दिले आहेत.



