गडचिरोलीविदर्भ

माजी खा. डॉ. अशोक नेते यांची अम्ब्रिशराव आत्राम यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

दोन्ही नेत्यांमध्ये महत्त्वपूर्ण चर्चा ; आगामी जि. प. निवडणुकीसाठी रणनीतीवर भर

अहेरी : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अहेरी येथील महिला व बाल रुग्णालयाच्या लोकार्पण सोहळ्यामुळे शहरात विकासाचा उत्साह पाहायला मिळाला. या कार्यक्रमानंतर, भाजपच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण राजकीय घडामोड झाली. माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोक नेते यांनी माजी राज्यमंत्री आणि अहेरी इस्टेटचे प्रमुख राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या अहेरी येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.

ही बैठक अत्यंत सखोल आणि विधायक वातावरणात पार पडली. दोन्ही नेत्यांनी अहेरी तालुक्याच्या विकास आणि संघटनात्मक बळकटीकरणावर लक्ष केंद्रित केले. अहेरी तालुक्यातील विविध विकासकामे, स्थानिक समस्या आणि सामान्य जनतेच्या अडचणी यावर सविस्तर चर्चा झाली. आगामी जिल्हा परिषद निवडणुका लक्षात घेऊन स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. मतांची देवाणघेवाण आणि पक्ष संघटनेला बळकटी देण्याच्या दिशेने रणनीती ठरवण्यात आली. बैठकीत स्थानिक प्रश्नांना प्राधान्य देत विकास आणि संघटन बळकटीकरणाच्या दिशा निश्चित करण्यात आल्या.

यावेळी भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बाबुराव कोहळे, समन्वयक प्रमोद पिपरे, महिला मोर्चा प्रदेश सचिव रेखा डोळस, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रशांत कुतरमारे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश दता, मुलचेरा तालुकाध्यक्ष संजय सरकार, भाजप जिल्हा उपाध्यक्ष अरुण हरडे, ज्येष्ठ नेते बादल शहा, ता. महामंत्री निखिल हलदार, यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. डॉ. नेते आणि राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या मंथनामुळे अहेरीच्या राजकारणाला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button