गडचिरोलीविदर्भ

अंगणवाडी सेविका व आशा वर्कर्सचा विराट मोर्चा ; थकीत कोरोना भत्त्यासाठी जिल्हा परिषदेवर धडक

गडचिरोली : कोरोना महामारीच्या अत्यंत कठीण काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सलग २४ महिने अहोरात्र सेवा बजावूनही, शासनाने जाहीर केलेला कोरोना भत्ता अद्याप मिळालेला नाही. या थकीत भत्त्यासह इतरही अनेक प्रलंबित मागण्यांकडे शासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ हजारो अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि आशा वर्कर्स यांनी सोमवारी (दि. १३) गडचिरोली जिल्हा परिषद कार्यालयावर एक विराट मोर्चा काढला. या मोर्चाच्या माध्यमातून आंदोलकांनी जोरदार निदर्शने करत प्रशासनाचे लक्ष वेधले.

हा मोर्चा प्रा. रमेशचंद्र दहिवडे, अरुण भेलके, किशोर जामदार, कॉ. अरुण लाटकर, छाया कागदेलवार, विठाबाई भट्ट आणि सुनंदा बावणे यांच्या संयुक्त नेतृत्वाखाली काढण्यात आला होता. आंदोलनादरम्यान बोलताना नेत्यांनी शासनाच्या धोरणांवर तीव्र शब्दांत आक्षेप घेतला. शासनाने कोरोना काळात मानधनाचे आणि भत्त्याचे आश्वासन देऊन काम करून घेतले. मात्र, आज पाच वर्षे उलटूनही हा भत्ता देण्यात आलेला नाही, असा थेट आरोप आंदोलकांनी केला.

प्रास्ताविक करताना अमोल मारकवार यांनी आठवण करून दिली की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार अंगणवाडी सेविकांना पेन्शन आणि ग्रॅच्युइटी लागू करण्याचे लेखी आश्वासन शासनाने तीन वर्षांपूर्वी दिले होते. परंतु, अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नाही, ही अत्यंत खेदजनक बाब आहे. किशोर जामदार यांनी सांगितले की, गेल्या चार महिन्यांपासून केंद्र शासनाचे मानधन अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मिळालेले नाही. जुने प्रश्न सोडवण्याऐवजी शासन नवनवीन समस्या निर्माण करत असल्याची टीका त्यांनी केली.

मोर्चानंतर प्रा. रमेशचंद्र दहिवडे यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे सविस्तर निवेदन सादर केले. यात २४ महिन्यांचा थकीत कोरोना भत्ता तात्काळ अदा करण्यात यावा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पेन्शन व ग्रॅच्युइटी तात्काळ लागू करावी. कर्मचाऱ्यांनी मोबाईलद्वारे केलेल्या कामाचा प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा. योजनेबाहेरील (अतिरिक्त) कामे अंगणवाडी सेविका व मदतनीसांकडून करून घेऊ नयेत. कर्मचाऱ्यांचा थकीत टीए-डीए (प्रवास व दैनिक भत्ता) त्वरित खात्यात जमा करावा. या प्रमुख मागण्यांचा समावेश आहे.

या मोर्चाच्या यशस्वी आयोजनासाठी आणि व्यवस्थापनासाठी गुलशन शेख, राजश्री खोब्रागडे, माया शेडमाके, ललिता केदार, उज्वला उंदीरवाडे, सुमन तोकलवार, रंजना चौकुंडे, भागीरथा दूधबावरे, रजनी चलकलवार, सिंधू मडावी, भारती रामटेके, विठाबाई भट्ट, सरिता आत्राम, छाया कागदेलवार, विश्रांती डोनाळकर आणि कौशल्या गौरकार यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी सुनंदा बावणे यांनी उपस्थित सर्व आंदोलकांचे आभार मानले. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button