गडचिरोलीविदर्भ

गोंडवाना विद्यापीठात जल व्यवस्थापन अध्यासन केंद्राचे उद्घाटन

विद्यापीठाचे काम केवळ शिक्षण देणे नसून समाजाला उपयोगी पडणे आहे – कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे

गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाच्या वतीने जलसंवर्धन, जलसंधारण आणि शाश्वत जलव्यवस्थापन क्षेत्रातील संशोधन, जनजागृती व समाजाभिमुख उपक्रमांना गती देण्यासाठी नवनिर्मित ‘जल व्यवस्थापन अध्यासन केंद्रा’चा भव्य उद्घाटन समारंभ नुकताच विद्यापीठाच्या सभागृहात पार पडला. या महत्त्वपूर्ण केंद्राचे उद्घाटन उमग ग्रामीण विकास संस्था, उमरा (जि. हिंगोली) चे अध्यक्ष जयाजी पाईकराव यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी बोलताना त्यांनी विद्यार्थ्यांची ताकद आणि कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या माध्यमातून पुढच्या पिढीला पाण्याचे समृद्ध भविष्य देण्याचा मानस व्यक्त केला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे प्रामुख्याने उपस्थित होते.

उद्घाटक म्हणून बोलताना जयाजी पाईकराव यांनी भूगर्भातील पाण्याची पातळी वाढवण्यासाठी प्रत्येक ठिकाणी पडणाऱ्या पाण्याचा थेंब जमिनीत मुरवण्याच्या गरजेवर विशेष भर दिला. यासोबतच त्यांनी नदीकाठ संवर्धन, जलसंधारण संरचना, प्रदूषण नियंत्रण, जैवविविधता संरक्षण, संशोधन आणि या संपूर्ण प्रक्रियेत लोकसहभाग कसा वाढवता येईल, या मुद्द्यांवर प्रकाश टाकला. “विद्यार्थी ही फार मोठी ताकद आहे. या विद्यापीठात शिकणारा प्रत्येक विद्यार्थी शिक्षणाचा एक भाग म्हणून या जल चळवळीत सहभागी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी अध्यासन केंद्राच्या स्थापनेमागील भूमिका स्पष्ट केली. “जल ही आपली मूलभूत गरज असून पाण्याचे जे काही साठे उपलब्ध आहेत, त्याची खरी मालकी संपूर्ण समाजाची आहे. त्यामुळे पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने झाला पाहिजे,” असे ते म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, “विद्यापीठाचे काम केवळ विद्यार्थ्यांना पदव्या आणि शिक्षण देणे एवढेच मर्यादित नसून, समाजासाठी ज्ञानाचे नवीन थर रचणे आणि समाजाला उपयोगी पडणे हे आहे. पाण्याच्या संदर्भात आमचे विद्यार्थी प्रत्यक्ष अभ्यास व संशोधन करून समाजाच्या ज्ञानात भर घालतील. या केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थी आपली सामाजिक, राष्ट्रीय व वैश्विक बांधिलकी जोपासतील.”

या सोहळ्याचे प्रस्तावक आणि व्यवस्थापन परिषद सदस्य गुरुदास कामडी यांनी प्रास्ताविकातून या अध्यासन केंद्राची पार्श्वभूमी आणि पुढील दिशा विशद केली. कार्यक्रमाचे उदघाटक जयाजी पाईकराव यांचा परिचय सहाय्यक प्राध्यापक डॉ. अतुल गावस्कर यांनी करून दिला. या  सोहळ्याला व्यवस्थापन परिषद सदस्य सतीश गोगुलवार, जल व्यवस्थापन अध्यासन केंद्र सल्लागार समितीचे सदस्य तथा गोसेखुर्द प्रकल्पाचे सिनिअर फेलो मिलिंद जोशी, फेलो राजेंद्र देशकर, श्रीमती पाईकराव, अधिसभा सदस्य शीला नरवडे, हेपट, अर्जुनवार, केशव गुरनुले आणि समन्वयक डॉ. अनंता गावंडे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन सहाय्यक प्राध्यापक धैर्यशील खामकर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार सहाय्यक प्राध्यापक डॉ. अनंता गावंडे यांनी मानले. या उद्घाटन सोहळ्याला विद्यापीठातील संशोधक, प्राध्यापक, विद्यार्थी, अधिकारी, कर्मचारी तसेच विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button