
७ महिन्यांपासून अवैध दारूविक्री पूर्णतः बंद ; पोलीस व मुक्तीपथचे सहकार्य
गडचिरोली : तालुक्यातील दिभना गावात गेल्या ७ महिन्यांपासून अवैध दारूविक्री पूर्णतः बंद करण्यात यश आले असून, दारूमुक्त गावाचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरले आहे. एकेकाळी १२ ते १३ दारूविक्रेते सक्रिय असलेल्या या गावात महिला, युवक आणि ‘मुक्तीपथ’ संघटनेने पोलिसांच्या सोबतीने दिलेल्या तीव्र लढ्यामुळे अखेर गावातील अवैध दारूचा नायनाट झाला आहे.
दिभना गावात पूर्वी अवैध दारूविक्री सुरू होती. गावात जवळपास १२ ते १३ विक्रेते सक्रिय असल्याने दारूचे व्यसन गल्लोगल्ली पसरले होते. यामुळे गावात भांडण-तंटे आणि कौटुंबिक कलह कमालीचे वाढले होते. घरातील कर्ता पुरुष आपले कष्टाचे, हक्काचे कमावलेले पैसे दारूवर उडवत असल्याने अनेक कुटुंबे आर्थिक संकटात सापडली होती, ज्याचा सर्वाधिक फटका घरातील महिला व बालकांना बसत होता. गावातील ही गंभीर परिस्थिती पाहता ‘मुक्तीपथ’च्या चमूने दिभना गावात विशेष बैठक घेऊन दारूविक्रीच्या परिस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या बैठकीत गावातील महिलांनी दारूमुळे निर्माण झालेल्या कौटुंबिक व सामाजिक समस्यांचा पाढाच वाचला. यावर उपाय म्हणून मुक्तीपथ टीमने गाव पातळीवर नियोजित कृती करण्याचे सुचविले. त्यानुसार गावात ‘मुक्तीपथ गाव संघटना’ आणि ‘युवक संघटना’ गठित करण्यात आली. या दोन्ही संघटनांच्या माध्यमातून गावात दारूविरोधी वातावरण निर्मितीला सुरुवात झाली.
गावातील दारू पूर्णपणे हद्दपार करण्यासाठी ग्रामस्थांनी कायदेशीर व संघटित पावले उचलली. संपूर्ण गावाने एकत्र येत ग्रामसभेत दारूविक्री बंदीचा कडक ठराव बहुमताने पारित केला. दारू विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी पोलीस प्रशासनाला रीतसर निवेदन सादर करण्यात आले. गाव संघटना आणि महिलांनी गावात अहिंसक कृती करत दारूविक्रेत्यांचा अवैध मुद्देमाल शोधून तो नष्ट केला. ग्रामस्थांच्या या आक्रमक पवित्र्यानंतर पोलीस विभागानेही गावात सातत्याने धडक मोहीम राबविली. पोलिसांनी कडक पावले उचलत तब्बल ५ प्रमुख दारूविक्रेत्यांवर गुन्हे दाखल केले. पोलिसांच्या या सातत्यपूर्ण आणि कायदेशीर कारवाईच्या भीतीपोटी उर्वरित दारूविक्रेत्यांनीही आपले अवैध धंदे कायमचे बंद केले.
ग्रामस्थांची एकजूट, महिला व युवकांचे सातत्यपूर्ण प्रयत्न आणि पोलीस प्रशासन व ‘मुक्तीपथ’ टीमच्या विशेष सहकार्यामुळे दिभना गावात मागील ७ महिन्यांपासून अवैध दारू पूर्णतः बंद आहे. दारूमुळे विस्कटलेली गावाची घडी आता पुन्हा बसू लागली असून, दिभना गावाने परिसरातील इतर गावांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. या यशासाठी सरपंच रमेश गुरनुले, पोलिस पाटील वाटगुरे, ग्रामसेवक वासंती देशमुख, मुक्तिपथ तालुका संघटक रेवनाथ मेश्राम व टीम, दारूबंदी समितीच्या अध्यक्ष शोभा नैताम, सदस्य अरुणा गुरनुले, मीराबाई लेंगुरे, हिराबाई जेंगठे, सर्वता गावतुरे, छाया भोयर, रंजिता गुरनुले, छाया गुरनुले, अंजिरा गुरनुले, शितल लेंगुरे, चंद्राबाई लेंगुरे, प्रतिभा सोनुले, शोभा गुरनुले, रेश्मा मोहुर्ले, नलू बावणे, मंगला जेंगठे यांनी विशेष परिश्रम घेतले.



