
कवडशी देश येथील धक्कादायक घटना, आत्महत्येचे कारण अस्पष्ट
चिमूर : तालुक्यातील कवडशी देश येथे एका सात महिन्यांच्या गर्भवती महिलेने विष प्राशन करून आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना बुधवारी (२४ सप्टेंबर) रोजी उघडकीस आली. प्रणाली राकेश गरमडे (२३) असे मृत महिलेचे नाव आहे.
प्रणाली आणि तिचा पती राकेश गरमडे यांनी कुटुंबांचा विरोध पत्करून प्रेमविवाह केला होता आणि ते गावातच वेगळे राहत होते. मंगळवारी (२३ सप्टेंबर) सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास पती राकेश झोपलेला असताना प्रणालीने घरात ठेवलेले कीटकनाशक प्राशन केले. काही वेळाने अस्वस्थ वाटू लागल्याने तिने पतीला या प्रकाराची माहिती दिली. राकेशने तात्काळ ग्रामस्थांच्या मदतीने तिला नागभीड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान प्रणालीचा मृत्यू झाला. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली आणि शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
प्रणालीच्या कुटुंबीयांनी कोणतीही तक्रार दाखल केली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, प्रणालीने आत्महत्या का केली, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ती सात महिन्यांची गर्भवती असल्याने या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पुढील तपास शंकरपूर पोलीस चौकीचे उपनिरीक्षक रवी वाघ, दुर्गेश नन्नावरे, सुनील घोडमारे आणि सुरज गुरुनुले करत आहेत.



