गोंदियाविदर्भ

टेलिकॉम केबल तोडाल तर सावधान! ; ३ वर्षांचा कारावास आणि २ कोटींच्या दंडाची तरतूत

खोदकामामुळे विस्कळीत होणाऱ्या नेटवर्कवर जिल्हा प्रशासनाचा कडक पवित्रा; ‘कॉल बीफोर यू डिगींग’ ॲप वापरण्याचे प्रशासनाचे आवाहन

गोंदिया : जिल्ह्यात विविध विकासकामे करताना शासकीय आणि खाजगी यंत्रणांकडून होणाऱ्या बेसुमार खोदकामामुळे दूरसंचार (Telecommunication) जाळे वारंवार विस्कळीत होत आहे. यामुळे मोबाईल संपर्कासह ऑनलाइन शासकीय सेवांमध्ये मोठे अडथळे निर्माण होत आहेत. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी दूरसंचार विभागाने विकसित केलेल्या ‘कॉल बीफोर यू डिगींग’ (Call Before U Dig – CBUDig) या ॲपचा वापर करणे आता बंधनकारक करण्यात आले आहे.

या संदर्भात शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी मिनाज मुल्ला यांच्या उपस्थितीत जिल्हास्तरीय समितीची बैठक पार पडली. यावेळी त्यांनी दूरसंचार पायाभूत सुविधांचे नुकसान करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले. बैठकीत नवीन दूरसंचार कायद्यातील तरतुदींबाबत कडक इशारा देण्यात आला. खोदकाम करताना दूरसंचार पायाभूत सुविधांचे नुकसान झाल्यास न्यू टेलिकॉम ॲक्ट २०२३ (प्रकरण ९) नुसार दोषी आढळल्यास ३ वर्षांपर्यंत तुरुंगवास. नुकसानीची तीव्रता पाहून २ कोटी रुपयांपर्यंतचा दंड. काही प्रकरणांत कारावास आणि दंड या दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

कोणतेही खोदकाम सुरू करण्यापूर्वी कंत्राटदार, जेसीबी मालक किंवा खाजगी यंत्रणांनी या ॲपवर नोंदणी करणे आवश्यक आहे. यामुळे संबंधित सर्व्हिस प्रोव्हायडरला (उदा. BSNL) खोदकामाच्या ठिकाणाची आगाऊ माहिती मिळेल. जमिनीखालील केबल्सची नेमकी जागा समजल्यामुळे नुकसान टाळता येईल. जिल्ह्याची इंटरनेट आणि मोबाईल सेवा अखंडित राहील.

अप्पर जिल्हाधिकारी मिनाज मुल्ला यांनी बैठकीत स्पष्ट केले की, जिल्ह्याच्या शेवटच्या टोकापर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचवण्यासाठी मोबाईल नेटवर्क असणे ही काळाची गरज आहे. “अखंडित सेवा पुरवण्यासाठी केवळ प्रशासन नाही, तर सर्व्हिस प्रोव्हायडर आणि कंत्राटदारांनीही समन्वय राखणे गरजेचे आहे. लवकरच संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि कंत्राटदारांची कार्यशाळा घेऊन त्यांना मार्गदर्शन करण्यात यावे,” अशा सूचना त्यांनी दिल्या.

या महत्त्वपूर्ण बैठकीला नगरपंचायत सालेकसा/आमगावचे मुख्याधिकारी प्रमोद कांबळे, गोंदियाचे मुख्याधिकारी संदिप बोरकर, BSNL गोंदियाचे उमेशनाथ मिश्रा, सुरेश ठाकरे, BSNL नागपूरचे आशीष संधी, प्रमोद रामटेके, वनविभागाचे विजय धांडे यांसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button