
आ. डॉ. मिलिंद नरोटे यांच्या सहकार्याने खेळाडू राष्ट्रीय स्तरावर!
गडचिरोली : जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राला सातत्याने पाठबळ देणारे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या सहकार्याने गडचिरोलीच्या खेळाडूंनी योगासन स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. नुकत्याच संभाजीनगर येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत गडचिरोलीच्या खेळाडूंनी एक सुवर्ण आणि तीन रौप्य पदके पटकावली. या यशाबद्दल खेळाडूंनी आमदार नरोटे यांचे आभार मानले असून, त्यांच्या या योगदानामुळे जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राला नवीन ऊर्जा मिळाली आहे.
महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स असोसिएशन आणि बृहन्महाराष्ट्र योग परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेत प्रवीण मोडक (वय ४५-५५) यांनी पायाचे संतुलन प्रकारात सुवर्ण पदक पटकावले. स्नेहा रत्नाकर वाणे (वय २८-३९), सुधा विनोद बोबडे (वय ४५-५५) आणि विशाल माधवराव भोंडकर (वय २८-३९) यांनी प्रत्येकी रौप्य पदक मिळवले. या विजयामुळे जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच महिला खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होत आहेत, ही बाब जिल्ह्यासाठी अत्यंत अभिमानाची आहे. खेळाडूंना प्रशिक्षण देणारे योग प्रशिक्षक डॉ. अनिल निकोडे यांचेही यात मोलाचे योगदान आहे.
या यशाबद्दल बोलताना आमदार डॉ. नरोटे म्हणाले, “गडचिरोलीच्या खेळाडूंनी मिळवलेले यश हा आपल्या जिल्ह्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. मी नेहमीच खेळाडूंच्या पाठीशी उभा राहिलो आहे आणि यापुढेही त्यांना शक्य ती सर्व मदत करत राहीन. जिल्ह्यातील तरुण-तरुणींनी खेळाच्या माध्यमातून नाव कमवावे यासाठी माझे सहकार्य नेहमीच राहील.”
विजेत्या खेळाडूंना माजी खासदार अशोक नेते, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, भाजप मित्र परिवार आणि जिल्हावासियांकडून शुभेच्छा देण्यात येत आहेत.



