गडचिरोलीविदर्भ

शवविच्छेदन टाळण्यासाठी पालकांनी बालकांचे मृतदेह स्वतः नेले

‘त्या’ दोन बालकांच्या मृत्यू प्रकरणात आरोग्य विभागाचा खुलासा

शवविच्छेदन अहवालानंतरच पुढील कार्यवाही – जिल्हा आरोग्य अधिकारी

गडचिरोली : जिमलगट्टा प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत दोन मृत बालकांना शववाहिका न मिळाल्याबाबत विविध माध्यमातून प्रसिद्ध वृत्तासंदर्भात, शवविच्छेदन टाळण्यासाठी पालकांनी बालकांचे मृतदेह स्वतः नेला असल्याचा खुलासा आरोग्य विभागाने केला आहे.

आरोग्य विभागाच्या खुलाशानुसार अहेरी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र जिमलगट्टा अंतर्गत येर्रागड्डा गावातील बाजीराव रमेश वेलादी (वय ६) व दिनेश रमेश वेलादी (वय ३) ह्या दोन भावंडांना प्राथमिक आरोग्य केंद्र जिमलगट्टा येथे ४ सप्टेंबर २०२४ ला सायंकाळी ५ ते ५.३० च्या दरम्यान त्यांच्या पालाकांनी आणले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. दुर्गा जराते यांनी तपासणी केली व दवाखाण्यात आणण्यापुर्वीच त्यांचा मृत्यु झाला असल्याचे दिसुन आले. घटनेच्या दिवशी प्राथमिक आरोग्य केंद्र जिमलगट्टा येथे वैद्यकीय अधिकारी डॉ. दुर्गा जराते, आरोग्य सहाय्यीका सुलोचना चिलमकर, परिचर सुभाष आत्राम, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी स्नेहल चौधरी, कंत्राटी वाहन चालक आशीष पस्पुनुरवार, डाटा एन्ट्री ऑपरेटर शकंर पेरगु उपस्थित होते.

मृत बालकांना नेण्याकरीता रुग्णवाहीका उपलब्ध करुन देण्यात येईल असे वैद्यकीय अधिकारी यांनी पालकांना सांगितले. परंतु शवविच्छेदनासाठी घेवुन जाणार अशी शंका आल्याने त्यांनी रुग्णवाहीकेची वाट न पाहता स्वतः मृतदेह स्वगावी येर्रागड्डा येथे घेऊन गेले. वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र जिमलगट्टा यांनी तात्काळ पोलीस स्टेशन जिमलगट्टा येथे सदर घटनेबाबत लेखी स्वरुपात कळविले. पोलीसांनी ५ सप्टेंबर २०२४ ला सकाळी ६ वाजताच्या सुमारास प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहीकेने येर्रागड्डा येथे जावुन पालकांना समजावुन मृत बालकांचे शव तपासणीकरिता उपजिल्हा रुग्णालय अहेरी येथे आणले व शवविच्छेदन आटोपुन त्याच रुग्णवाहीकेने त्यांना त्यांच्या गावी येर्रागड्डा येथे सोडण्यात आले.

२९ व ३० ऑगस्ट रोजी आरोग्य कर्मचारी यांनी नियमित गृहभेटी दरम्यान रमेश वेलादी यांचे घरी भेट दिली असता आई व्यतीरिक्त कुणालाही आरोग्याबाबत तक्रार नव्हती. तसेच त्यांचे रक्तनमुणे सुद्धा हिवतापाकरिता दुषीत आढळुन आलेले नाही. ४ सप्टेंबर २०२४ ला आरोग्य सेवक आर.एम. मडावी यांच्या गृहभेटी दरम्यान सदर कुटुंब घरी उपस्थीत नव्हते. तसेच या दरम्यान सदर कुटुंबातील कुणीही शासकीय आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधला नाही. या संपूर्ण प्रकरणात शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढिल कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हा आरोग्य अधिकारी प्रताप शिंदे यांनी कळविले आहे.

ज्या नागरिकांना किंवा त्यांच्या परिवारातील सदस्यांना अचानक ताप येणे किंवा इतर आरोग्यविषयक समस्या उद्भवल्यास त्यांनी वेळ न दडवता व अंधश्रद्धेतून इतर उपाययोजना न राबवता तातडीने सर्वप्रथम प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय किंवा नजीकच्या रुग्णालयात आपल्या आरोग्याची तपासणी करून घेण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button