चंद्रपूरविदर्भ

भरधाव मालवाहक ई-रिक्षाच्या धडकेत अडीच वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

नवरगाव येथील घटना; गहाणे कुटुंबावर दुःखाचा डोंगर, ई-रिक्षा चालकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

सिंदेवाही : तालुक्यातील नवरगाव येथील महादेव मोहल्ल्यात रविवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास एक अत्यंत हृदयद्रावक दुर्घटना घडली. घराशेजारील रस्त्याच्या कडेला खेळत असलेल्या अवघ्या अडीच वर्षांच्या चिमुकलीला भरधाव मालवाहक ई-रिक्षाने जोरदार धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या चिमुकलीचा रुग्णालयात नेत असताना वाटेतच दुर्दैवी मृत्यू झाला. श्रीजा महेश गहाणे (वय २ वर्षे ६ महिने) असे मृत चिमुकलीचे नाव असून, ती आई-वडिलांची एकुलती एक मुलगी होती. तिच्या या अकाली जाण्याने गहाणे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण नवरगाव परिसरावर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास श्रीजा आपल्या घराशेजारील रस्त्याच्या कडेला खेळत होती. खेळता खेळता ती रस्ता ओलांडत असतानाच अचानक समोरून आलेल्या एका भरधाव मालवाहक ई-रिक्षाने तिला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की श्रीजा गंभीररीत्या जखमी झाली. अपघातानंतर परिसरात एकच धावपळ उडाली. स्थानिक नागरिक आणि नातेवाईकांनी तिला तातडीने उपचारासाठी ब्रह्मपुरी येथील रुग्णालयात हलवण्याचा प्रयत्न केला; मात्र दुर्दैवाने रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच तिची प्राणज्योत मालवली.

घटनेची माहिती मिळताच सिंदेवाही पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. अपघातास कारणीभूत ठरलेली मालवाहक ई-रिक्षा जप्त करण्यात आली असून चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चालकाविरुद्ध सिंदेवाही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

शवविच्छेदनानंतर श्रीजाचा मृतदेह नवरगाव येथे आणण्यात आला असता, तिचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण गाव लोटले होते. निष्पाप एकुलत्या एक चिमुकलीच्या मृत्यूने उपस्थितांचे डोळे पाणावले होते. या घटनेनंतर निवासी भागातून बेदरकारपणे धावणाऱ्या वाहनांवर पोलिसांनी कडक नियंत्रण ठेवावे आणि लहान मुलांच्या सुरक्षेसाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी संतप्त मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button