चंद्रपूरविदर्भ

न्यायासाठी बैलबंडीसह तहसील कार्यालयावर धडक ; रस्त्याच्या प्रश्नावर शेतकऱ्याचे अनोखे आंदोलन

अनेक वर्षांपासून पाठपुरावा करूनही तोडगा नाही; सखोल चौकशी करून रस्ता मिळवून देण्याची मागणी

वरोरा : शेतात जाणाऱ्या रस्त्याच्या गंभीर प्रश्नावर वारंवार पाठपुरावा करूनही न्याय मिळत नसल्याने संतप्त झालेल्या एका शेतकऱ्याने शुक्रवारी वरोरा तहसील कार्यालयात थेट बैलबंडीसह धडक दिली. कोणताही मोर्चा, घोषणाबाजी किंवा गर्दी न करता आसाळा येथील या शेतकऱ्याने एकट्यानेच केलेल्या या अनोख्या आंदोलनाने संपूर्ण प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले असून सध्या तालुकाभरात या घटनेची जोरदार चर्चा रंगली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आसाळा येथील संबंधित शेतकऱ्याला आपल्या स्वतःच्या शेतात जाण्यासाठी योग्य रस्ता उपलब्ध नसल्याने गेल्या अनेक वर्षांपासून प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. या प्रश्नाच्या कायमस्वरूपी सोडवणुकीसाठी महसूल प्रशासनासह संबंधित विभागांकडे अनेकदा हेलपाटे मारले, अर्ज-विनंत्या केल्या; मात्र तरीही कोणताही मार्ग निघाला नाही. अखेर प्रशासकीय अनास्थेला कंटाळून या शेतकऱ्याने अनोख्या मार्गाने आपला रोष व्यक्त करण्याचे ठरवले.

शुक्रवारी हा शेतकरी आपली बैलबंडी घेऊन थेट वरोरा तहसील कार्यालयाच्या आवारात दाखल झाला. अचानक आवारात बैलबंडी उभी राहिल्याने तेथील नागरिक व कर्मचाऱ्यांचे लक्ष वेधले गेले. शेतात जाण्यासाठी कायदेशीर व योग्य रस्ता तत्काळ मोकळा करून देण्यात यावा आणि प्रशासनाने या प्रकरणात निष्पक्ष चौकशी करून आपल्याला न्याय द्यावा, ही त्याची मुख्य मागणी होती.

आंदोलनादरम्यान शेतकऱ्याने तहसीलदार प्रशासनाला रीतसर निवेदन सादर केले. संबंधित शेतरस्ता चुकीच्या व नियमबाह्य पद्धतीने मंजूर करण्यात आल्याचा गंभीर आरोपही त्याने या निवेदनातून केला आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल व वस्तुनिष्ठ चौकशी करण्याची मागणी त्याने लावून धरली.

दरम्यान, तहसील प्रशासनाने शेतकऱ्याचे निवेदन स्वीकारत प्रकरणाची कायदेशीर चौकशी करून नियमानुसार योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले. प्रशासनाच्या आश्वासनानंतर शेतकऱ्याने आपले आंदोलन शांततेत मागे घेतले. एकाकी शेतकऱ्याने बैलबंडीसह न्यायासाठी ठोकलेला हा ठिय्या सध्या सर्वत्र चर्चेत असून, आता महसूल प्रशासन यावर काय तोडगा काढते, याकडे संपूर्ण परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button