गडचिरोलीमुख्य बातमीविदर्भ

महिला मजुरांवर वज्राघात ; १ महिला ठार, ११ जखमी

आरमोरी तालुक्यातील डार्ली येथील घटना  

आरमोरी : शेतात निंदण करण्यासाठी गेलेल्या महिलांवर वीज कोसळल्याने एक महिला जागीच ठार तर 11 महिला जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (दि. 20) दुपारी 2 वाजताच्या सुमारास तालुक्यातील डार्ली येथे घडली. विजया विलास गेडाम (वय 40, रा. नरोटीमाल) असे मृत महिलेचे नाव आहे.

डार्ली येथील केशव लाकडे यांच्या शेतात निंदा काढण्यासाठी नरोटी माल येथील 11 महिला नेहमीप्रमाणे शेतात गेल्या होत्या. एकाएक वातावरण बदल होऊन विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. पावसापासून बचाव करण्यासाठी महिलांनी शेताला लागून असलेल्या नागोबा मंदिरात आसरा घेतला. सदर महिला मंदिराच्या गेटवर उभी असताना वीज कोसळली. या विजेच्या धक्क्याने विजया गेडाम यांचा जागीच मृत्यू झाला. तर 11 महिला जखमी झाल्या. यातील सरिता सरावन मडावी (वय 55) व संगीता प्रमोद गेडाम (वय 23) या गंभीर जखमींना उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. तर 9 किरकोळ जखमी महिलांना प्राथमिक आरोग्य केंद्र वडधा येथे उपचार सुरू आहे.

कधीही वातावरणात बदल होऊन मोठ्याप्रमाणा वीज पडून मनुष्यहानीच्या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. घटनेची माहिती प्राप्त होताच आरमोरी पोलिसांनी घटनास्थळ गाठित पंचनामा केला. मृतक महिलेचे मृतदेह शवविच्छेदनासाठी आरमोरी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले असून, पुढील तपास आरमोरी पोलिस करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button