गडचिरोलीतेलंगणाविदर्भ

हैद्राबादमध्ये १३० माओवाद्यांचे आत्मसमर्पण; मुख्यमंत्र्यांसमोर टाकली शस्त्रे

गडचिरोली : तेलंगणा सरकारच्या नक्षलविरोधी मोहिमेला शनिवार, ७ मार्च रोजी अभूतपूर्व यश मिळाले आहे. तब्बल १३० माओवाद्यांनी हिंसाचाराचा मार्ग सोडून मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण केले. विशेष म्हणजे, यावेळी नक्षलवाद्यांनी १२४ अत्याधुनिक शस्त्रे आणि हजारो जिवंत काडतुसे पोलिसांच्या स्वाधीन केली आहेत. राज्याच्या इतिहासातील हे आजवरचे सर्वात मोठे सामूहिक आत्मसमर्पण मानले जात आहे.

हैदराबादमधील तेलंगणा पोलिसांच्या ‘इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर’मध्ये हा कार्यक्रम पार पडला. शनिवारी सकाळी छत्तीसगड, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमधून हे माओवादी चार बसमधून हैदराबादमध्ये दाखल झाले. सुरक्षा दलांच्या वाढत्या दबावामुळे आणि सरकारच्या पुनर्वसन धोरणामुळे प्रभावित होऊन त्यांनी मुख्य प्रवाहात येण्याचा निर्णय घेतला.

आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांनी केवळ शरणागती पत्करली नाही, तर मोठ्या प्रमाणात आधुनिक शस्त्रेही सोपवली आहेत. यामध्ये AK-47 रायफल्स, INSAS रायफल्स, SLR रायफल्स, हजारो राउंड दारूगोळाचा समावेश आहे.

पोलिस महासंचालक बी. शिवधर रेड्डी यांनी माहिती दिली की, जप्त केलेल्या शस्त्रांची गुणवत्ता आणि संख्या पाहता नक्षलवादी संघटनांच्या लष्करी ताकदीला हा मोठा तडाखा बसला आहे. शरणागती पत्करणाऱ्या माओवाद्यांमध्ये छत्तीसगडमधील १२५, तेलंगणा मधील 4, आणि आंध्र प्रदेश मधील 1 माओवाद्याचा समावेश आहे. यामध्ये पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मी (PLGA) च्या पहिल्या बटालियनचे कमांडर, केंद्रीय समितीच्या सदस्यांचे वैयक्तिक अंगरक्षक आणि ३ राज्य समिती सदस्यांसह अनेक उच्चपदस्थ नेत्यांचा समावेश आहे.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री रेवंत रेड्डी म्हणाले, कोणत्याही विचारधारेच्या नावाखाली मानवी जीव घेण्याचा कोणालाही अधिकार नाही. प्रत्येक जीव मौल्यवान आहे. आम्ही माओवाद्यांना आवाहन करतो की त्यांनी बंदूक सोडून लोकशाहीच्या मार्गाने समाज परिवर्तनात सहभागी व्हावे.

मुख्य प्रवाहामध्ये सामील होणाऱ्या या माजी माओवाद्यांसाठी सरकारने विशेष पॅकेज जाहीर केले आहे. यामध्ये आर्थिक मदत, रोख बक्षिसे, राहण्यासाठी घर, आरोग्य सुविधा आणि रोजगाराची हमी दिली जाणार आहे.

तज्ज्ञांच्या मते, या मोठ्या आत्मसमर्पणानंतर तेलंगणातील माओवाद्यांची राज्य समिती आता पूर्णपणे संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. २०२५ मध्ये ५०० हून अधिक नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली असून, नक्षलग्रस्त भागात आता शांतता आणि विकासाचे नवे पर्व सुरू होण्याची चिन्हे आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button