
कारवाई न झाल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा
गडचिरोली: अहेरी उपविभागातील पेरमिली आणि अहेरी येथील बांधकाम प्रकल्पांमध्ये सुरू असलेल्या निकृष्ट कामामुळे नागरिक आणि शाळकरी विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या गंभीर प्रकाराकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत, सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने योग्य दखल न घेतल्यास, संबंधित विभागाच्या विरोधात मोठे जनआंदोलन उभारण्याचा इशारा ताटीकोंडावार यांनी दिला आहे.
पेरमिली येथे ३९ कोटी रुपयांचे नवीन उपकेंद्राचे बांधकाम सुरू आहे. मात्र, सध्या सुरू असलेल्या बेसमेंटचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याने ते दबले जात असल्याचा आरोप ताटीकोंडावार यांनी केला आहे. तसेच, अहेरी येथे अंदाजे ७ ते ९ कोटी रुपयांचे बांधकाम सुरू असून, त्यातील काँक्रीट रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे आहे. या कामात सळी (सलाखी) योग्य रीतीने न लावता आणि खाली ८० मिमीचे बोल्डर सोलिंग न करता काम सुरू असल्याचा ताटीकोंडावार यांचा दावा आहे.
या निकृष्ट कामाची चौकशी करण्याबाबत भ्रष्टाचार निवारण समिती गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष संतोष ताटीकोंडावार यांनी यापूर्वीच आमदार धर्मराव बाबा आत्राम यांना निवेदन दिले होते. एवढेच नाही तर, सदर गंभीर बाबीची तक्रार मुख्यमंत्री तसेच बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडेही करण्यात आली होती. मात्र, या सर्व तक्रारींची कोणतीही दखल घेण्यात आली नाही आणि संबंधित ठेकेदाराच्या विरोधात कोणतीही कारवाई केली नाही. यामुळे “पाणी कुठे मुरते आहे हे समजेनासे झाले आहे,” अशी प्रतिक्रिया ताटीकोंडावार यांनी व्यक्त केली आहे.
या भ्रष्ट ठेकेदारांवर तात्काळ कारवाई न झाल्यास, संबंधित विभागाच्या विरोधात मोठे जनआंदोलन उभारण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी दिला आहे.



