गडचिरोलीमुख्य बातमीविदर्भ

नवसाला पावणारा गणपती म्हणून पातानीलच्या बाप्पाची ख्याती

अहेरी : तालुक्यातील आलापल्ली या गावापासून चार किमी दूर अंतरावर सागवानाच्या जंगलात पातानील गणेश बाप्पा आहे. निसर्गरम्य वातावरणात सदर मंदिर असल्याने देवदर्शनासह निर्सगाचाही आनंद घेता येत असल्याने तालुक्यातील अनेक भाविक या मंदिराला भेट देतात. प्रत्येक शनिवार व सोमवारी या ठिकाणी गर्दी उसळते. नवसाला पावणारा अशी या गणपतीची ख्याती आहे.

१९८१ साली या भागात वन विभागाच्या अखत्यारीत चार हत्ती होते. कापलेले सागवान जंगलाबाहेर आणण्याच्या रोजच्या कामावर हत्ती नेमले असताना यातील एक हत्ती जंगलात बेपत्ता झाला. दोन दिवस उलटूनही या किर्र जंगलात त्याचा काही पत्ता लागेना. शेवटी वन विभागाच्या शोधमोहिमेतील कर्मचारी व मजुरांनी बाप्पाच्या चरणी साकडे घातले. ‘हत्ती सापडू दे’ अशी आराधना केली. आणि काय आश्चर्य काही क्षणातच हरविलेल्या हत्तीची किंकाळी मजुरांच्या कानी आली. मजुरांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली. तेव्हा लक्षात आले की हत्तीच्या पायातील साखळदंड एका दगडाला अडकले आहेत. ते काही केल्या निघेनात. शेवटी जोर लावून हा दगड बाहेर काढला गेला. बघतात तर काय चक्क या दगडाला श्रीगणेशाचे रुपडे होते. या पद्धतीने वन विभागावरील संकट गणरायानेच दूर केले. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन ही मूर्ती साफ करून तिची प्राणप्रतिष्ठा केली.

मजुरांनी या मंदिराच्या शेजारी एक झाड लावले होते. ते आता मोठे झाले आहे. त्याभोवती आता चबुतरा बांधला गेला आहे. पिण्याच्या पाण्यासाठी एक बोअरवेल खोदले आहे. येथे सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्यास भाविक, पर्यटकांची गर्दी वाढेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button