
इरई धरण परिसरातील मच्छीघाटावर कारवाई ; वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या मोहर्ली वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या सीतारामपेठ बीटमध्ये वन्यजीवांची शिकार करून त्याचे मांस शिजवून खाणाऱ्या एका दाम्पत्याला वन विभागाने रंगेहाथ पकडले. इरई धरण परिसरातील भामडेळी येथील मच्छीघाटावर शनिवारी सकाळी ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी वन्यजीव संरक्षण कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून पती-पत्नीला अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सीतारामपेठ बीटमधील मच्छीघाट परिसरात काही व्यक्ती वन्यजीवांची शिकार करून त्याचे मांस शिजवत असल्याची गोपनीय माहिती वनविभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारावर शनिवारी सकाळी ११:३० वाजताच्या सुमारास वनविभागाच्या पथकाने अचानक धाड टाकली. यावेळी ज्योती शैलेश घंटसाल (३५) आणि तिचा पती शैलेश नोमनाद्री घंटसाल (३८) (दोघेही रा. कैकलूरु, जि. कृष्णा, आंध्र प्रदेश) हे संरक्षित असलेल्या ‘फ्लॅप शेल टर्टल’ (Flap Shell Turtle) या जातीच्या कासवाची शिकार करून त्याचे मांस शिजवून खात असताना रंगेहाथ आढळले.
वनविभागाने तातडीने दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर वन्यजीव संरक्षण कायद्याच्या कलम ९, ३९ आणि ५१ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. जप्त केलेले मांस आणि शिकार करण्यासाठी वापरलेले साहित्य वनविभागाने आपल्या ताब्यात घेतले आहे. हे दाम्पत्य मूळचे आंध्र प्रदेशातील असून ते या भागात शिकारीच्या उद्देशानेच आले होते का, याचा अधिक तपास आता वनविभाग करत आहे.
सदर कारवाई ताडोबा बफर क्षेत्राचे उपसंचालक कुशाग्र पाठक आणि वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या पथकात वनरक्षक सुरेंद्र मंगाम, क्षेत्र सहायक संजय जुमडे व इतर वनकर्मचाऱ्यांचा समावेश होता. ताडोबा आणि आजूबाजूच्या परिसरात वन्यजीवांच्या शिकारीच्या घटना रोखण्यासाठी वनविभागाने गस्त वाढवली असून, अशा कृत्यात आढळणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.



