
उमरझरी येथील थरारक घटना ; महिलेच्या मानेला गंभीर दुखापत ; वनविभागाच्या तत्परतेमुळे मोठी जाळपोळ टळली
भंडारा : जिल्ह्यातील साकोली तालुक्यात मानव-वन्यजीव संघर्षाने आता उग्र रूप धारण केले आहे. बाम्पेवाडा येथील शेतकरी मृत्यूची घटना ताजी असतानाच, शनिवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास उमरझरी शेतशिवारात वाघाने एका महिलेवर जीवघेणा हल्ला केला. आपल्या पतीच्या डोळ्यादेखत वाघाने महिलेची मान जबड्यात पकडून तिला १० फूट फरफटत नेल्याच्या या थरारक घटनेमुळे संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माया रामकृष्ण सोनावणे आणि त्यांचे पती रामकृष्ण सोनावणे हे शनिवारी सकाळी आपल्या शेतात मिरची तोडण्याचे काम करत होते. दरम्यान, शेतालगत असलेल्या जंगलातून एका पट्टेदार वाघाने अचानक माया यांच्यावर झडप घातली. वाघाने त्यांची मान जबड्यात पकडून त्यांना १० फूट अंतरापर्यंत फरफटत नेले. पती रामकृष्ण यांनी आरडाओरड केल्याने आणि नशीब बलवत्तर असल्याने माया सोनावणे या वाघाच्या तावडीतून सुटल्या, मात्र त्यांच्या मानेला गंभीर दुखापत झाली आहे.
जखमी माया सोनावणे यांना तातडीने साकोली येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, जखम गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात (रेफर) आले आहे. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच उमरझरी आणि आजूबाजूच्या गावातील शेकडो नागरिक संतप्त होऊन घटनास्थळी व शिवनटोला वनचौकीवर जमा झाले. वनविभागाच्या निष्क्रियतेबद्दल संताप व्यक्त करत दुपारी काही गावकऱ्यांनी चक्क जंगलाला आग लावण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती हाताबाहेर जाण्याची चिन्हे दिसत असतानाच माजी जिल्हा परिषद सदस्य माहेश्वरी नेवारे यांनी घटनास्थळी धाव घेत गावकऱ्यांची समजूत घातली. त्याचवेळी वनविभागाच्या पथकानेही हस्तक्षेप करून गावकऱ्यांना जंगलाबाहेर काढले आणि संभाव्य जाळपोळ रोखली.
सध्या उमरझरी परिसरात तणावपूर्ण शांतता असून वनविभागाची गस्त वाढवण्यात आली आहे. १० दिवसांपूर्वीच बाम्पेवाडा येथे वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा बळी गेला होता, आता पुन्हा ही घटना घडल्याने वनविभागाने या नरभक्षक वाघाचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. वन्यप्राण्यांच्या सततच्या हल्ल्यांमुळे शेतकरी शेतात जायला घाबरत असून, प्रशासनाने ठोस पावले न उचलल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.



