
अहेरी : नगर पंचायत प्रशासनाची कोणतीही रीतसर परवानगी न घेता बांधण्यात आलेली माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडलवार यांची चार मजली इमारत अखेर गुरुवारी (१२ फेब्रुवारी) प्रशासनाने जमीनदोस्त केली. नगरविकास मंत्रालय आणि स्थानिक न्यायालयांच्या आदेशानंतर ही धडक कारवाई करण्यात आली असून, यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
प्रभाग क्रमांक १५ मधील ही इमारत बेकायदेशीर असल्याचे सांगत नगर पंचायत प्रशासनाने कारवाईची तयारी केली होती. याप्रकरणी नगरविकास मंत्रालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव, अहेरीचे अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालय, तसेच दिवाणी व फौजदारी न्यायालयाने इमारत पाडण्यास हिरवा कंदील दिला. त्यानंतर गेल्या १० दिवसांपासून ही इमारत पाडण्याचे काम सुरू होते, गुरुवारी दुपारी १२:३० वाजता इमारत पूर्णपणे पाडण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, अजय कंकडलवार यांनी २३ जानेवारी २०२५ रोजी खाजगी जमिनीवर इमारत बांधण्यासाठी नगर पंचायतीकडे अर्ज केला होता. मात्र अर्जासोबत इमारतीचे कोणतेही आवश्यक कागदपत्रे सादर केली नव्हती. नगर पंचायतीने त्यांना सलग तीन वेळा नोटिसा बजावल्या होत्या. नोटिसांना केराची टोपली दाखवत कंकडलवार यांनी बांधकाम सुरूच ठेवले होते.
नियमांचे उल्लंघन करून बेकायदेशीर बांधकाम केल्याप्रकरणी नगर पंचायत प्रशासनाने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून कंकडलवार यांच्याविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला होता. गुरुवारी अंतिम टप्प्यातील कारवाई दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी घटनास्थळी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
सत्तेत असलेल्या किंवा माजी पदाधिकाऱ्यांवर झालेली ही मोठी कारवाई ‘बेकायदेशीर बांधकामे’ करणाऱ्यांसाठी एक कडक इशारा मानली जात आहे.



