‘पीएम जनमन’ आणि ‘धरती आबा’ योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीतून आदिवासी विकासाला गती द्या – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके

योजनांच्या लाभापासून एकही आदिवासी वंचित राहू नये; आदिवासी संस्कृतीचे आदर्श दर्शन, प्रदर्शन आणि सादरीकरण व्हावे
गडचिरोली : जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी केंद्र सरकारच्या ‘पीएम जनमन’ (प्रधानमंत्री जनजातीय न्याय महाअभियान) आणि ‘धरती आबा’ (धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान) या महत्त्वाकांक्षी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहन राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी केले. या योजनांच्या लाभापासून एकही आदिवासी माणूस वंचित राहू नये, हे सुनिश्चित करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
गडचिरोली येथील सुमानंद सभागृहात आयोजित लाभार्थी मेळावा, नवीन इमारतींचे लोकार्पण व भूमिपूजन सोहळा, नीती आयोग अंतर्गत आकांक्षित तालुका व जिल्हा संपूर्णत: अभियान सन्मान सोहळा आणि रानभाजी महोत्सवाच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली, अहेरी व भामरागड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन झाले. यात भामरागड प्रकल्पांतर्गत कार्यालयीन इमारत, शालेय इमारत व मुलींचे वसतिगृह, तसेच गडचिरोली प्रकल्पांतर्गत शासकीय आश्रम शाळा सोडे, रेगडी, कारवाफा येथील मुला-मुलींच्या वसतिगृहांचा समावेश होता. यासोबतच, घाटी, येरमागड, भाडभिडी, अंगारा (गडचिरोली प्रकल्प), बाम्हणी, गुड्डीगुड्डम (अहेरी प्रकल्प) आणि कोठी, जांबीया (भामरागड प्रकल्प) येथील मुला-मुलींच्या वसतिगृहांच्या बांधकामाचे भूमिपूजनही मंत्री डॉ. उईके यांच्या हस्ते आभासी पद्धतीने करण्यात आले.

याप्रसंगी आमदार सुधाकर अडबाले, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, आदिवासी विकास विभाग नागपूरच्या अपर आयुक्त आयुषी सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी रणजित यादव (गडचिरोली), कुशल जैन (अहेरी), नमन गोयल (भामरागड), आणि चंद्रपूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे (आदिवासी) कार्यकारी अभियंता नितीन मुत्यालवार आदी मान्यवर उपस्थित होते.
मंत्री डॉ. उईके यांनी ‘धरती आबा’ योजनेची गडचिरोली जिल्ह्यातील ४११ गावांमध्ये प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले. येत्या १५ तारखेला होणाऱ्या ग्रामसभांमध्ये या योजनेचे नियोजन केल्यास, गडचिरोली जिल्हा ‘धरती आबा’ योजनेत १०० टक्के अंमलबजावणीसह राज्यात पहिला क्रमांक पटकावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यासाठी ग्रामसभांनी आतापासूनच नियोजनाचा कृती आराखडा तयार करण्याचे आवाहनही त्यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदिवासी व्यक्तीला केंद्रस्थानी ठेवून सुरू केलेल्या या योजनांमधून २५ पेक्षा अधिक लाभ १७ विभागांद्वारे देण्यात येणार असून, एकही आदिवासी माणूस या लाभापासून वंचित राहणार नाही, याची खात्री करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
शिक्षणाच्या बाबतीत बोलताना, मंत्री डॉ. उईके यांनी पुढील महिन्यात पात्र शिक्षकांची आश्रम शाळांमध्ये नियुक्ती होईल आणि त्यामुळे शाळेची गुणवत्ता अधिक सुधारेल, असा विश्वास व्यक्त केला. येत्या काळात इंग्रजी माध्यमाच्या शासकीय आश्रम शाळाही सुरू करण्याचे संकेत त्यांनी दिले. प्रत्येक अधिकाऱ्याने एक आश्रम शाळा किंवा वसतिगृह दत्तक घेऊन तेथील अडचणी सोडवाव्यात, अशी सूचनाही त्यांनी केली. बिरसा मुंडा यांच्या जयंतीदिनी, १५ नोव्हेंबर रोजी, आदिवासी गौरव दिन साजरा करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी आदिवासी संस्कृतीचे आदर्श दर्शन, प्रदर्शन आणि सादरीकरण व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून गडचिरोली जिल्ह्यात उद्योग, शिक्षण, आरोग्य आणि कौशल्य विकासावर लक्ष केंद्रित करून विकासाची वाटचाल सुरू असल्याचे मंत्री उईके यांनी नमूद केले. ‘विकसित भारत’ सोबत ‘विकसित महाराष्ट्र’ होण्यासाठी सर्वांनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन डॉ. उईके यांनी यावेळी केले.
आमदार डॉ. नरोटे यांनी आदिवासी विभागाचा जास्तीत जास्त निधी शेती, सिंचन व शिक्षणावर खर्च व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली, तर आमदार अडबाले यांनी आदिवासी विभागात पदभरतीचा मार्ग मोकळा केल्याबद्दल मंत्री डॉ. उईके यांचे आभार मानले. कार्यक्रमात विविध योजनांच्या लाभार्थ्यांना धनादेश आणि पीएम जनमन आवास योजनेअंतर्गत गृहप्रवेशाच्या चाव्या वितरित करण्यात आल्या.



