
97 नग देशी दारू जप्त ; महिलांचा पुढाकार
देसाईगंज : तालुक्यातील शंकरपूर येथे पुन्हा दारूविक्री सुरू होताच दारूबंदी संघटनेच्या महिलांनी विक्रेत्यांविरोधात मोहीम हाती घेतली आहे. होळीच्या पूर्वसंध्येला दारू विक्रेत्याकडून 97 नग देशी दारू जप्त करीत देसाईगंज पोलिस स्टेशनमध्ये एका विक्रेत्यावर गुन्हा दाखल केला आहे. दुर्गेश देवानंद गाधाडे असे विक्रेत्याचे नाव आहे.
शंकरपूर गावात पूर्वी अवैध दारूविक्री बंद होती. परंतु मागील चार महिन्यांपासून विक्रेत्यांनी पुन्हा दारूविक्री सुरू केली आहे. यामुळे युवक व्यसनाच्या आहारी जात आहेत. ही बाब लक्षात येताच दारूबंदी गाव संघटनेच्या महिलांची बैठक मुक्तिपथ तालुका संघटिका भारती उपाध्ये यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी आपल्या गावाला पुन्हा दारूमुक्त करण्यासाठी प्रयत्न करण्याची तयारी महिलांनी दर्शविली. ग्रामपंचायत समितीने देखील गावातील चार विक्रेत्यांना नोटीस बजावून अवैध व्यवसाय तत्काळ बंद करा अन्यथा 30 हजारांचा दंड वसूल करण्याचा इशारा दिला आहे.
होळीच्या सणानिमित्त गावात अवैध दारूविक्री होण्याची शक्यता लक्षात घेता, दारूबंदी महिला संघटना, मुक्तीपथ, देसाईगंज पोलिस व पोलिस पाटील यांनी सलग दोन दिवस कृती करीत विक्रेत्यांकडून 97 नग देशी दारू जप्त केली आहे. याप्रकरणी एका विक्रेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईमुळे इतर विक्रेत्यांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे. गावाला पुन्हा दारूमुक्त करण्यासाठी महिलांनी पुढाकार घेतला आहे.



