
गडचिरोली : ओबीसी आरक्षणात मराठा समाजाला सरसकट समाविष्ट करण्याच्या मागणीवरून आंदोलन करणारे मनोज जरांगे यांच्या भूमिकेविरोधात गुरुवारी (दि.२८) गडचिरोली शहरात भारतीय जनता पार्टी-ओबीसी मोर्चाच्या वतीने जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले. शहरातील इंदिरा गांधी चौकात झालेल्या या आंदोलनात जरांगे मुर्दाबादच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.
या आंदोलनात माजी खासदार आणि भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोक नेते यांची विशेष उपस्थिती होती. त्यांच्यासोबत जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, ओबीसी नेते प्रशांत वाघरे, ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष बाबुराव कोहळे, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, क्रिष्णा गजबे, कि.मो.प्र. सचिव रमेश भुरसे, समन्वयक प्रमोद पिपरे, महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव रेखा डोळस, मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा योगिता पिपरे, भाजपा नेत्या डॉ. चंदा कोडवते, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष भास्कर बुरे, आदिवासी आघाडी जिल्हाध्यक्ष डॉ. नितिन कोडवते, कि.मो. जिल्हाध्यक्ष विलास भांडेकर, भाजयुमो जिल्हाध्यक्ष मधुकर भांडेकर, ओबीसी मोर्चाचे माजी शहराध्यक्ष अनिल पोहनकर, तालुकाध्यक्ष दतुजी सुत्रपवार, शहराध्यक्ष अनिल कुनघाडकर, अनिल तिडके, पुष्पा करकाडे, रविंद्र गोटेफोडे, नंदु पेठेवार, आरमोरी तालुकाध्यक्ष पंकज खरवडे, बंडू झाडे, रमेश नैताम, सरपंच आकाश निकोडे, मुक्तेश्वर काटवे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.
यावेळी बोलताना डॉ. अशोक नेते म्हणाले, “ओबीसी आरक्षणात घुसखोरी करणाऱ्या मनोज जरांगेचा आम्ही जाहीर निषेध करतो. आज गडचिरोली जिल्ह्यात निषेधाचा आवाज उठला आहे आणि यापुढे प्रत्येक तालुक्यात आक्रमक आंदोलन करून जरांगे यांना त्यांची जागा दाखवली जाईल.” ते पुढे म्हणाले, “ओबीसी आरक्षण हा घटनात्मक हक्क आणि अधिकार असून, कुणालाही यावर गदा आणू दिली जाणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी आमची ठाम मागणी आहे. संपूर्ण ओबीसी समाज या लढ्यात आपल्या पाठीशी उभा आहे.”
आंदोलकांनी ‘जरांगे मुर्दाबाद’ अशा घोषणा देत आपला संताप व्यक्त केला. कार्यकर्त्यांनी मनोज जरांगे यांच्या प्रतिमेला चप्पलांनी मारून आपला निषेध नोंदवला. या वेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी ओबीसी समाजाच्या हक्कांच्या रक्षणासाठी आपण ठाम आणि आक्रमक भूमिका घेण्याचा निर्धार व्यक्त केला. निषेध आंदोलनानंतर, भाजपाच्या एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांची भेट घेतली. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी या विषयावर चर्चा केली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवण्यासाठी एक निवेदन सादर केले.



